पान:माझे चिंतन.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७६ माझे चिंतन

प्रश्नचिन्ह आज जगापुढे उभे आहे, या प्रश्नाला काही उत्तर आहे काय हे पाहण्याचा आपण थोडासा प्रयत्न करू.

भांडवलशाही

 युद्धे कशी टाळता येतील हे पाहावयाचे असेल तर आधी युद्धे का होतात हे पाहणे अवश्य आहे. भांडवलशाही हे युद्धाचे प्रधान कारण आहे, असे आज मानले जाते. गेल्या शतकात कार्ल मार्क्स याने हे मत मांडल्यापासून भांडवलशाही व तज्जन्य साम्राज्यशाही आणि वसाहतवाद हे एकच युद्धाचे कारण आहे असे सर्व सुशिक्षित जग मानू लागले आहे. ते एकमेव कारण आहे की नाही, हा प्रश्न वादग्रस्त असला तरी ते एक कारण आहे यात मुळीच शंका नाही. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान, अमेरिका या देशांत औद्योगिक क्रान्ती होऊन प्रचंड प्रमाणात मालाचे उत्पादन होऊ लागले तेव्हा त्या मालाला बाजारपेठा कमी पडू लागल्या. त्या वेळी मागासलेल्या देशांना जिंकून तेथे साम्राज्ये आणि वसाहती स्थापून तेथील बाजारपेठा कबजात घेण्याचे वरील सर्व राष्ट्रांचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यांतूनच गेल्या दोन-तीनशे वर्षांतली सर्व युद्धे उद्भवलेली आहेत. ही गोष्ट इतकी सर्वसामान्य आहे की, तिच्याविषयी तपशिलात जाऊन चर्चा करण्याचे किंवा तिच्यासाठी आधारप्रमाणे देत बसण्याचे कारण नाही.

वंशभेद

 मार्क्स व त्याचे अनुयायी यांना मान्य नसले तरी वंशभेद हे युद्धाचे तितकेच प्रबळ असे दुसरे कारणही आहे. या विसाव्या शतकातही आहे. हिटलरने वंशश्रेष्ठतेच्या अभिमानानेच जगाला सहा वर्षे अग्निकुंडात लोटले होते. या भयानक विकृतीपायी नॉर्डिक जर्मनांनी लक्षावधी ज्यू लोकांना विषधूमाने ठार मारले. आणि ही वंशभेदाची जहरी प्रेरणा अजूनही तितकीच जिवंत आहे हे दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि ब्रिटन ही राष्ट्रे जगाला दाखवून देत आहेत. हिटलरच्या मनात वंशद्वेष किती तीव्र होता हे त्याच्या आत्मचरित्रावरून व इतर वक्तव्यांवरून दिसून येते. त्याने म्हटले आहे की, 'आम्ही पोलंड, युक्रेन, रशिया इ. देश जिंकू आणि तेथील स्लाव्ह लोकांना भूमितलावरून नष्ट करून टाकू.