पान:माझे चिंतन.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






युद्ध अटळ आहे काय ?





 युद्धे होऊ नयेत म्हणून मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून मानवजातीतल्या थोर पुरुषांनी प्रयत्न केले आहेत असे दिसते. 'लीग ऑफ नेशन्स' व 'यूनो' या दोन संस्थांची नावे अलीकडे नित्य ऐकू येतात. त्यातूनही यूनो व तिचे सेक्रेटरी जनरल उ थांट यांचे नाव हल्ली रोजच वृत्तपत्रात येत असते. आज दळणवळणाची साधने व वृत्तपत्रे यांमुळे युद्ध टाळण्याचे हे प्रयत्न सामान्य जनांच्याही रोज निदर्शनास येत आहेत. पण वर सांगितल्याप्रमाणे प्रागैतिहासिक कालापासून हे प्रयत्न चालू आहेत आणि युद्धेही चालू आहेत; आणि बहुधा जगाच्या अंतापर्यंत शांततेचे प्रयत्न आणि युद्धे ही हातांत हात घालून अशीच प्रवास करीत राहतील असे वाटते. महाभारतातला कृष्ण शिष्टाईचा प्रसंग प्रसिद्धच आहे. कौरव- पांडवांचे युद्ध टळावे म्हणून श्रीकृष्णांनी केलेला तो अखेरचा प्रयत्न होता. पण युद्ध टळले नाही. श्रीरामचंद्रांनी रावणाकडे अंगदाला पाठवून शांततेने प्रश्न सोडविण्याचा असाच प्रयत्न केला होता. बहुधा दरवेळी युद्धाच्या आधी असे प्रयत्न केले जातात. आणि बहुधा ते विफल होऊन युद्धे होत राहतात.
 पण आजपर्यंतचा इतिहास निराळा आणि आजचा निराळा. आज मानवाला इतकी भयानक संहारअस्त्रे सापडली आहेत की यापुढे युद्ध झाले तर ते जागतिकच होईल, त्यात अखिल मानवजातीचा संहार होऊन जाईल आणि सर्व मानवी संस्कृती नष्ट होऊन मागे जे अत्यंत अल्पसंख्य मानव शिल्लक राहतील त्यांना वन्य अवस्थेतच राहावे लागेल, हे दारुण भवितव्य सर्वांना अटळ वाटत असल्यामुळे युद्धे टाळण्याचे आज कसोशीने प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न सफल होतील काय ? का युद्धे ही अटळच आहेत ? अग्नीच्या ज्वाळांनी लिहिलेले हे