पान:माझे चिंतन.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७२ माझे चिंतन

 समाजवादी समाजरचनेसाठी सात्त्विक गुणांची आवश्यकता शतपट जास्त का आहे, याचे थोडेसे दिग्दर्शन करून हे विवेचन संपवू.

चारित्र्य हा पाया

 समाजवादी समाजरचनेत धनाची वाटणी व्हायची असते. आणि धनाचा मोह मनुष्याला सर्वात जास्त असतो. आपल्याकडे बाराशेच्या आत उत्पन्न असलेल्या लोकांच्या मुलांना सरकार शिक्षण मोफत देते. आज ज्यांचे उत्पन्न याच्या दुपटीतिपटीने जास्त आहे, असे सहस्रावधी लोक या सवलतीचा फायदा घेत आहेत ! शेतकऱ्यांना, लहान उद्योगधंदे काढणाऱ्यांना, सहकारी संस्थांना सरकार दोन्ही हातांनी पैसा वाटीत आहे. हा सर्व पैसा 'कर्ज' म्हणून दिलेला असतो. पण तो परत करण्याची कल्पना स्वप्नातही कोणाला शिवत नाही. आणि ज्यांना गरज नाही असेच लोक हा पैसा पदरी पाडून घेतात. समाजवादी समाजरचनेत पूर्वीपेक्षा दसपट, सहस्रपट कायदे जास्त करावे लागतात. कारखाने कोणी कोठे काढावे यासंबंधी पूर्वी निर्बंध नव्हते. आता उत्पादन हे गरजा पाहून करावे लागते, म्हणून बंधने आली. त्यामुळे आयात-निर्यातीवर बंधने आली. देशातल्या वाहतुकी वर बंधने आली. शेतीत कोणी कोणती पिके काढावी यावर बंधने आली. वस्तूंच्या किंमतीसंबंधी कायदे करणे आले. शाळेच्या व्यवस्थेसंबंधी कायदे, तेथील पाठ्य- पुस्तकांसंबंधी कायदे,कामगार, शिक्षक, अधिकारी यांच्या पगारासंबंधी कायदे, दुकाने, कारखाने यांच्या कामाच्या वेळासंबंधी कायदे, आरोग्याविषयी, डॉक्टरांविषयी कायदे अशी पावला-पावलाला कायद्याची जखड बंधने समाजवादी रचनेत घालावी लागतात. नाही तर अन्न, वस्त्र, घर, शिक्षण व आरोग्य यांची न्याय्य वाटणी होणे अशक्य आहे. हे कायदे पाळावयाचे म्हणजे नागरिकांचे व पोलिसांचे चारित्र्य किती निर्मळ पाहिजे याची, सध्या भारतात काय घडत आहे त्यावरून सहज कल्पना येईल. समाजवादी समाजरचनेत पोलीस हा भ्रष्ट होणे अपरिहार्य आहे. प्रत्येक पावलाला त्याला पैसा मिळविण्याची संधी असते. ती दिसत असूनही पोलीसदल निर्मळ ठेवण्याइतके चारित्र्य ज्या समाजाजवळ नाही, त्याला समाजवादी समाजरचना कशी पेलणार ?