पान:माझे चिंतन.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ७१ 

झाली आहेत, बहकली आहेत, याचे कारण म्हणजे आमच्या शाळांतील कडक शिस्तीचा अभाव, हे होय. त्या 'परमिसिव्ह एज्युकेशनची' फळे आम्ही आता भोगत आहो." डॉ. रूथ अलेक्झांडर या विषयावर अगदी चिडून लिहितात. त्या म्हणतात, "मुलांच्या किळसवाण्या गुन्ह्याला आत्माविष्कार म्हणावयाचे किंवा मानसिक आजार म्हणावयाचे अशी सध्याची तऱ्हा आहे. अशा प्रकारे शिस्तीच्या जागी आत्माविष्कार आला आणि धर्माच्या जागी मानसशास्त्र आले. त्यामुळे गुन्हेगारी साथीच्या रोगासारखी पसरत आहे."

दैवी संपदेचा विकास

 आतापर्यंत गुन्हेगारीच्या कारणांचे जे विवेचन केले, त्यावरून हे दिसते की, समाजाची काही नवी व्यवस्था करताना मनुष्याच्या अंगच्या दैवी संपदेची जी वाढ करणे अवश्य असते, तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि आतापर्यंत संवर्धिलेली संपदा नाश पावत आहे याची दखल न घेतल्यामुळे आजचे अनर्थ ओढवत आहेत. लोकशाही स्थापन करताना विवेक, सहिष्णुता, समाजहिताची जाणीव, प्रत्येक मानवाच्या हक्काची जाणीव, बुद्धिप्रामाण्य या गुणांची जोपासना करणे अवश्य असते. ती ज्यांनी केली नाही त्या समाजाची लोकशाही टिकू शकत नाही. समाजवादी समाजरचना आणि कल्याणकारी राज्य या नव्या व्यवस्थांचे हेच झाले आहे. पूर्वी राजकीय हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य हे सर्वांना द्यावयाचे होते. पण काही समाजांना व्यक्तिस्वातंत्र्य हा शापच ठरला. कारण ते पेलण्यासाठी अवश्य त्या गुणांची त्यांनी जोपासना केली नाही. आज समाजाने उत्पन्न केलेले धन सर्वांना द्यावयाचे आहे. पण त्याचे विभाजन करताना लोकशाहीच्या वेळचेच प्रमाद लोक पुन्हा करीत आहेत असे दिसते. पूर्वी समाजातील व्यक्तींच्या योग- क्षेमाची जबाबदारी सरकार कधीच घेत नसे. किंबहुना व्यक्तीच्या कोणत्याच विकासाची जबाबदारी मागे शासनावर नव्हती. सर्वांना अन्नवस्त्र मिळावे, ही जबाबदारी सुद्धा कोणाच्या शिरी नव्हती. मग शिक्षण, आरोग्य यांची कथा काय ? आता हे सर्व शिरी घ्यावे अशी नवी आकांक्षा आहे. लोकशाही पेलण्यास दैवी संपदेची एकपट गरज असल्यास आता ती शतपट आहे. आणि तिची जोपासना न करताच कल्याणकारी राज्ये स्थापन करण्याचे प्रयत्न झाल्यामुळे जगात प्रथमच आलेली लक्ष्मी ही आक्काबाई ठरत आहे.