पान:माझे चिंतन.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ७३ 


सेवावृत्ती

 समाजवादी समाजरचनेत सर्वांना अन्न, वस्त्र, घर, आरोग्य व शिक्षण द्यावयाचे असल्याने कामे इतकी वाढतात की लाखो लोकांनी त्यांतली निम्म्याहून अधिक कामे स्वयंसेवावृत्तीने विनामूल्य शिरावर घेतली नाहीत तर, कितीही उत्पादन वाढले तरी ते धन पुरणार नाही. अमेरिकेत स्त्रियांच्या अनेक संस्था आहेत. त्या लहान मुलांचे संगोपन, रुग्णसेवा, अपंगांची सेवा, ग्रंथालयाची व्यवस्था, चर्चमधली व्यवस्था, शाळांतून अध्यापन, अशी अनेक प्रकारांची सेवा 'स्वयंसेविका' म्हणून करतात. त्यांना धन्यवाद देताना आयसेनहॉवर एकदा म्हणाले होते की, या कामासाठी पगार द्यावा लागला असता तर तो कधीच परवडला नसता. अमेरिकेसारख्या अत्यंत श्रीमान् राष्ट्राची ही स्थिती ! मग इतरांची काय असेल ? तेव्हा कायदापालनाच्या कर्तव्यबुद्धीला सेवावृत्तीची जोड असली, लक्षावधी नागरिकांच्या ठायी ही वृत्ती बाणलेली असली तरच समाजवादी समाजरचना (किंवा कल्याणकारी राज्य) शक्य आहे. असे असताना जेथे कर्तव्यबुद्धीचा अभाव आहे, सर्व समाज चारित्र्यहीन आहे, दुष्काळ, महापूर, भूकंप यांसाठी द्यावयाच्या पैशांचा सुद्धा अपहार करण्याची वृत्ती लोकांत आहे, तेथे ती कशी शक्य होईल ? समृद्धी कितीही आली, उत्पादन कितीही वाढले, लक्ष्मी कितीही प्रसन्न झाली तरी ती अशा स्थितीत पुरी पडणार नाही. आणि ती पुरी पडली नाही की, काळा बाजार, वशिला, अन्याय, अपहार यांचे राज्य सुरू होते. स्वीडनमधल्या समाजवादी लोकांना आज हीच भीती वाटत आहे !

शापाचे वरदान होईल

 याचा अर्थ असा की, आज समृद्धी हा शाप ठरत आहे हा दोष समृद्धीचा नसून मनुष्याच्या चारित्र्यहीनतेचा आहे. काही चारित्र्यहीनता अनेक कारणांमुळे आधीच निर्माण झालेली होती. समाजवादी समाजरचना बेसावधपणे आणल्यामुळे तिच्यात आणखी भर पडली. यामुळे सर्व जगात आज समृद्धी व गुन्हेगारी यांत कार्यकारणसंबंध प्रस्थापित होऊ पाहात आहे !
 महाभारतात म्हटले आहे की,

अर्थानां ईश्वरो यः स्यात् इंद्रियाणां अनीश्वरः ।
इंद्रियाणां अनैश्वर्यात् ऐश्वर्यात् भ्रश्यते हि सः ॥