पान:माझे चिंतन.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७० माझे चिंतन


मुक्त उद्रेकाचे फल

 फ्रॉइडच्या तत्त्वज्ञानाची अत्यंत विषारी फळे चाळीस पन्नास वर्षे चाखल्यानंतर आता पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञ स्वसमाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. माया, प्रेम, लालन यांच्याइतकीच धाक, वचन, कडक शिक्षा, कडवी शिस्त यांची मुलांच्या निरामय वाढीला आवश्यकता असते, असे सांगू लागले आहेत. डॉ. जॉन स्कॉफिल्ड हे अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, "हल्लीच्या मुलांना पौगंडावस्था (८ ते १८ वयाचा काळ - टीन एज) मोठी धोक्याची झाली आहे. कारण आई-बापांच्या कडक शिस्तीचे कवच हल्ली त्यांना मिळत नाही. आमच्या पौगंडावस्थेत आम्ही पुंडाई करू लागलो तरी वडिलांच्या धाकामुळे तिला आळा बसे, आणि अनर्थापासून आमचे रक्षण होत असे. आता दुर्दैवाने आईबापांच्या अपत्यसंगोपनाच्या कल्पना बदलल्या आहेत. दारू पिऊ नये, मोटार बेफाम हाकू नये, वर्गातल्या मुलांना मारू नये यासंबंधी ते मुलांशी वाद करीत बसतात. वास्तविक हे वय वादाचे नाही. कडक शिस्तीचे, हुकमतीचे आहे. मुलांच्या अंतरातील दैवी व आसुरी या दोन्ही संपदा या वेळी उफाळत असतात. त्यांतील दैवी संपदेला अवसर देऊन आसुरीचा नाश करणे अवश्य असते. आणि त्या कामी मुलांना मातापित्यांचे साह्य हवे असते. या वेळी अत्यंत कठोरपणे, वेळी फोडून काढूनही, आई-बापांनी हे साह्य केले पाहिजे. त्या दुष्ट प्रवृत्तींचा स्वैर उद्रेक होऊ दिला तर मुले वाममार्गी होतात व पुढे माता-पित्यांनाच दोष देतात. त्या पौगंडावस्थेतही बाह्यतः शिस्तीवर मुळे चिडत असली, तिला विरोध करीत असली, तरी मनातून तुम्ही कणखर राहावे, ढिले होऊ नये अशीच त्यांची इच्छा असते. अशा वेळी आई-बापांनी माघार घेतली तर मुलांच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर नाहीसा होतो. म्हणून अन्न, प्रेम यांच्या इतकीच कडक शिस्त ही मुलांच्या वाढीला अवश्य आहे, हे सध्याच्या पिढीच्या आई- बापांनी जाणावे."
 हे मानसशास्त्र फ्रॉइडच्या बरोबर उलट आहे. अंतरीचे उद्रेक दडपले तर मुले विकृत होतात असे त्याचे शास्त्र होते. म्हणून त्यांना मुक्त अवसर द्यावा असे तो म्हणत होता. पण त्यामुळे ती आसुरी संपदा वाफेसारखी विरून जाण्याऐवजी विषवल्लीसारखी माजतच चालली आणि बालगुन्हेगारीची अनन्वित फळे तिला आली. न्या. मू. विल्फ्रेड ए. वॉल्टिमेड म्हणतात, "आजची तरुण मुले वाह्यात