पान:माझे चिंतन.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ६९ 


माया आणि शिक्षा

 बालवयात मुलांना अनेक खोड्या कराव्याशा वाटतात, पुस्तके फाडावीशी वाटतात, चाकू उघडावासा वाटतो, खिडकीबाहेर ओणवावेसे वाटते, दहा लाडू खावेसे वाटतात. या सर्वांवर पूर्वी एकच उपाय होता. तो म्हणजे आईबापांचा धाक. वडिलांची हुकमत पूर्वी फार कडक असे. त्यांचे ऐकले नाही तर मार मिळेल, ही भीती पूर्वी होती. फ्रॉइडच्या तत्त्वज्ञानामुळे हे सर्व आता पालटले आहे. मुलांना दरवेळी अमके करू नको, असे बोलू नको, असे सांगणे म्हणजे त्यांच्या अंतरीच्या ऊर्मी दडवणे होय, आणि अशा ऊर्मी दडपल्या की, त्यांच्या मनात नाना प्रकारच्या विकृती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तित्वाची हानी होते, असे फ्रॉइडचे तत्त्वज्ञान सांगते. यामुळे कुटुंबातील 'धाक' हा शब्द गेला, आणि त्यापासून फल काय मिळाले ? तर मुले स्वैर झाली व पुढच्या वयात त्यांची गुन्हेगारीकडे प्रवृत्ती होऊ लागली. लंडन विद्यापीठाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक एच. जे. आयसेंक यांनी फ्रॉइडच्या सिद्धान्तावर अतिशय कडक टीका करून 'मुलांच्या या दण्डहीन बाल्यातच, अनिर्बंध आविष्कारातच गुन्हेगारीची बीजे आहेत' असे म्हटले आहे. शिक्षणशास्त्रातही या मुलांच्या मनाच्या अनिर्बंध विकासाचे असेच खूळ माजले आहे. 'डोंट' हा निषेधाचा शब्दही शिक्षकाने वापरू नये, असे शास्त्र आहे. डॉ. डोनाल्ड ए. ब्लॉक यांनी 'नॅशनल पेरेंट-टीचर' या मासिकात 'डोंट बी अफ्रेड ऑफ डोंट्स' या नावाचा लेख लिहून या खुळचटपणावर टीका केली आहे. ते म्हणतात, 'आईबापांनी मुलांवर माया करावी, पण तितक्याच कडकपणे त्यांचा निग्रहही करावा.' 'मानसशास्त्रच मानसशास्त्रावर कसे उलटते ते पाहा. एक मुलगी रस्त्यात खेळत होती. तिची मैत्रीण तिला म्हणाली, "तुला आई रस्त्यात खेळू देते ? असे कसे ? माझी आई मला असे कधीच खेळू देणार नाही. कारण मी गाडीखाली सापडेन अशी तिला भीती वाटते." डॉ. ब्लॉक म्हणतात, "ती मुलगी हे अभिमानाने सांगत होती. आई-बापांच्या अशा कडक शिस्तीचा मुलांना मनातून अभिमानच वाटतो. कारण तीतून त्यांचे आपल्यावर प्रेम आहे, हेच त्यांना दिसत असते." हेही तत्त्व त्यांनी मानसशास्त्रान्वयेच सांगितले आहे ! रस्त्यात खेळू नये, गोड फार खाऊ नये, हे स्वतःहून मुलांना कळत नसते. त्याची कारणे सांगावी तर ती त्यांना समजत नाहीत. तेव्हा त्यांना वचक पाहिजे. शिक्षा पाहिजे ! पण हे फ्रॉइडला मंजूर नाही !