पान:माझे चिंतन.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६८ माझे चिंतन

शकणार नाही, हे सर्वमान्य होत चालले आहे. याचे मुख्य कारण मातापित्यांची माया, त्यांच्या ठायीचे अपत्यांविषयीचे अनन्य प्रेम, त्यांचे अनंत अपराध पोटात घालण्याची त्यांची क्षमाशीलता, अपत्यांविषयी अहोरात्र चिंता वाहण्याची व कष्ट करण्याची त्यांची वृत्ती या सर्वांतून मुलांना शिक्षण मिळत असते हे होय. भाऊ- बहिणी यांच्यासाठी करावी लागणारी लहान कामे, हळूहळू त्यातून निर्माण होणारी जबाबदारीची जाणीव यांमुळे त्याग, सेवा, निग्रह यांचे प्राथमिक पाठ मुलांना घरात मिळत असतात. आज हे संस्कार सर्व लुप्त झाले आहेत. कारण एक तर मध्यंतरी त्यांचे महत्त्व कोणाला वाटेनासे झाले होते आणि आईबाप दोघेही दिवसभर घराबाहेर असल्यामुळे त्यांना संगोपनाला वेळच मिळेनासा झाला होता आणि आता सर्व कुटुंबीयांच्या योगक्षेमाची जबाबदारी शासनाने घेतल्यावर एकमेकांसाठी झीज सोसल्यामुळे जे पाश निर्माण व्हावयाचे ते तुटून गेले व या संस्थेचा पायाच निखळून पडला. अशा रीतीने गुन्हेगारीला अप्रत्यक्ष रीतीने समृद्धीच कारण झालेली आहे

फ्रॉइडचे मानसशास्त्र

 सध्याच्या जगातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या दोन कारणांचा येथवर आपण विचार केला. आता तिसऱ्या कारणाचा विचार करावयाचा आहे. ते कारण म्हणजे फ्रॉइडचे मानसशास्त्र हे होय. वरील दोन कारणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समृद्धीशी निगडित आहेत. फ्रॉइडच्या मानसशास्त्रामुळे जो अनर्थ झाला आहे, त्याचा तसा समृद्धीशी संबंध नाही. मग त्याचा येथे विचार कशासाठी करावयाचा ते प्रथम स्पष्ट करतो. समृद्धीमुळे जे अनर्थ झाले आहेत ते वास्तविक समृद्धीमुळे झाले नसून, समाजाच्या चारित्र्यहीनतेमुळे झाले आहेत आणि तो समाजाचा रोग नष्ट झाला तर समृद्धी हा शाप ठरणार नाही, असे प्रतिपादन मला करावयाचे आहे. समाजाची ही जी चारित्र्यहीनता, ती कुटुंबसंस्थेची विघटना व फ्रॉइडच्या मानसशास्त्राच्या वर्चस्वामुळे समाजाची शिस्त, बंधने, नियमने यांना आलेली शिथिलता यामुळे निर्माण झालेली आहे. आणि अशा समाजाच्या अवस्थेतच कल्याणकारी राज्य व समाजवादी समाजरचना यांची स्थापना झाल्यामुळे समृद्धी हा शाप ठरू लागला आहे. हा विचार स्पष्ट करण्यासाठी येथे प्रथम फॉइडच्या मानसशास्त्राच्या दुष्परिणामांची चिकित्सा करणे अवश्य आहे.