पान:माझे चिंतन.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ६७ 

नसला तरी सध्या बहुसंख्य स्त्रिया दिवसभर कामधंद्याच्या निमित्ताने घराबाहेरच असतात. त्यामुळे अशा संसारातली मुले ही एका दृष्टीने मातृहीनच असतात. या प्रकारे कुटुंबसंस्था सर्वत्र मोडकळत चालली आहे आणि सध्याच्या बाल- गुन्हेगारीचे ते एक प्रधान कारण आहे असे मत प्रसिद्ध संशोधक सदरलँड व क्रेसी यांनी आपल्या 'क्रिमिनॉलजी' या ग्रंथात मांडले आहे. लहानपणी योग्य संस्कार झाले नाहीत, मुलांना शिस्त लावली गेली नाही, तर ती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळतात. मुलांपेक्षा मुलींच्या बाबतीत ही हानी जास्त होते. भग्न संसारामुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असते असे त्यांचे मत आहे. प्रौढांमध्येही गुन्हे करून तुरुंगात जाणाऱ्यांत कुटुंबहीनांचे प्रमाण जास्त असते. एक लक्ष लोकांतील तुरुंगात जाणाऱ्यांचा इतिहास पाहता असे दिसते की सर्वात कमी प्रमाण विवाहितांचे, विधवा-विधुरांचे त्यापेक्षा जास्त आणि घटस्फोटितांचे सर्वोत जास्त ! (पृ. १७७- १७८)

कोणी कोणाचा नाही

 कुटुंबविघटना हे वाढत्या गुन्हेगारीचे प्रमुख कारण आहे याविषयी दुमत नाही; पण काही पंडित असे सांगतात की, ही विघटनाही समृद्धीमुळे व तीतून निर्माण झालेल्या कल्याणकारी राज्यामुळेच झालेली आहे. स्त्रीचे व्यक्तित्व, तिचे अर्थार्जन त्यामुळे तिला मिळालेली स्वतंत्रता व समता यामुळे कुटुंबसंस्थेवर फार मोठा आघात झाला होता, हे खरे; पण यामुळे सर्वच कुटुंबे भग्न झाली होती असे नाही. पण आता मुलांची, त्यांच्या शिक्षणाची, रोजगाराची, सर्व कुटुंबीयांच्या आरोग्याची, मातापित्यांच्या वृद्धापकाळाची सर्वच जबाबदारी शासनाने घेतल्यामुळे कुटुंबातली माणसे एकमेकांची कोणी नव्हेत, असे झाले आहे. कोणाला कोणाची गरजच नाही, त्यामुळे कोणाला कोणाचा धाक नाही. आता वर म्हणजे दिवसभर श्रमून आलेल्या चार पाच माणसांची रात्री विश्रांती घेण्याची जागा, म्हणजे एक धर्मशाळा झाली आहे. यामुळे घरात मुलांच्यावर : होणारे संस्कार आता होत नाहीत आणि पुढेही समाजवादी रचना असेपर्यंत होणार नाहीत- होणे अशक्य आहे, असे समाजशास्त्रवेत्ते सांगत आहेत. आज पाश्चात्त्य देशांत मुलांना दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून अठरा-वीस वयापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. तरीही कुटुंबसंस्थेला पर्याय म्हणून त्यातली एकही संस्था चालू