पान:माझे चिंतन.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६६ माझे चिंतन

अमेरिकेत होत्याच. अजूनही त्यांचा चोरटा व्यापार 'माफिया' सारख्या संघटनांच्या द्वारे चालतोच. पण या टोळीतल्या कोणत्याही माणसाला स्वतः ही द्रव्ये सेविण्यास परवानगी नव्हती ! कारण त्यामुळे पोलिसांकडून पकडले जाण्याचा धोका जास्त असतो. 'हिप्पी' किंवा 'डिगरस' या पंथांत असली बंधने नाहीत. कारण असा हीन का होईना, पण व्यापार करून पैसे मिळवावे एवढेसुद्धा उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यांपुढे नाही. 'एलएसडी' व 'अँफेटामाइन' ही द्रव्ये इतकी भयंकर आहेत की हिरोइन, अफू, चरस ही त्यापुढे काहीच नव्हेत. त्याचा एक कण जरी पोटात गेला तरी मनुष्य धुंद व बेफाम होतो, वेडा होतो व खून, आत्महत्या, जाळपोळ करण्याची त्याची प्रवृत्ती अनिवार होते. ही मुले चौथ्या पाचव्या मजल्यावरून खुशाल उड्या टाकतात. आपण हवेत तरंगू शकू, असे त्यांना वाटत असते. ती धावत्या मोटारीपुढे उभी राहतात. आपण मोटारी थांबवू शकू असा भ्रम त्यांना असतो. अशा तंद्रीतच ही शेकडो मुले व मुली एकत्र राहतात. स्वैर समागमाला तेथे सीमाच नसते; खून- मारामाऱ्या नित्याच्याच आहेत. आसपासच्या लोकांना किळस येईल अशा घाणीत ती राहतात. स्वच्छतेचे व त्यांचे वाकडे आहे. गुप्तरोग त्यांच्यात इतके वाढत आहेत की तीच एक भयानक समस्या होऊन बसली आहे.
 समृद्धीमुळे समाजवादी समाजरचना आली व तिच्यामुळे मनुष्याची कुटुंब व समाज यांच्याविषयीच्या जबाबदारीची जाणीवच नष्ट झाली, हे सध्या पाश्चात्त्य समाजाच्या अधःपतनाचे प्रधान कारण होय. त्याचा विचार येथवर केला. आता इतर कारणांचा विचार करावयाचा आहे. ह्यांतील एक कारण म्हणजे भग्न संसार होय.

भग्न संसार

 अमेरिकेत आणि कमी-अधिक प्रमाणात इतर पाश्चात्त्य देशांतही दर तीन विवाहांतला एक विवाह नियमाने भंग पावतो. भग्न संसारात मुलांच्या मनावर सुसंस्कार होणे अशक्यप्राय असते. इतकेच नव्हे तर अशा अनेक संसारांतली मुले केवळ वाऱ्यावर सोडली जातात. आणि मग ती गुन्हेगार होतात. वर सांगितलेले हिप्पी, डिगरस अशांसारखे जे पंथ, त्यांच्या बुडाशी भग्न संसार हेच कारण आहे असे अनेक समाजशास्त्रज्ञ म्हणतात. संसार प्रत्यक्ष भंगलेला