पान:माझे चिंतन.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





प्रस्तावना






 ' माझे चिंतन ' या माझ्या निबंध संग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती १९५५ साली प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आता अनेक वर्षांनी माझे मित्र कॉन्टिनेंटल प्रकाशनचे चालक श्री. अनंतराव कुलकर्णी ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करीत आहेत.
 पहिल्या आवृत्तीतले काही निबंध गाळून त्यांच्या ऐवजी १९५५ नंतर लिहिलेले काही इतर निबंध या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट केले आहेत. या निबंधांत काही जास्त महत्त्वाच्या समस्यांचा विचार केला आहे. जे निबंध काढून टाकले त्यातील विषयांपेक्षा हे विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे वाटल्यामुळे हा बदल केला आहे.
 आपल्या समाजाचे अवलोकन व अभ्यास करताना त्यातील अनेक उणीवा ध्यानात येतात. अशा काही उणीवा, समाजाला, विद्यार्थ्यांना विचारवंतांना दाखवाव्या, त्यांचे मूळ कारण शोधावे, उपायचिंतन करावे आणि त्यांविषयी सर्वांगीण अभ्यास करून मग त्या विषयांवर लेख लिहावा अशी पद्धत साधारणतः मी अनेक वर्षे अवलंबिलेली आहे. 'माझे चिंतन' हा बव्हंशी अशा लेखांचा संग्रह आहे.
 ऐहिक जीवनातील राजकारण, समाजरचना, अर्थव्यवस्था, विज्ञान- संशोधन इ. क्षेत्रांतील विषय घेऊन त्यांचा शास्त्रीय पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून त्यांवर मोठे ग्रंथ लिहावे ही प्रथा भारतात फारशी नाही. काही अपवाद सोडल्यास प्राचीन काळीही नव्हती. ब्रिटिशांच्या पूर्वीच्या