पान:माझे चिंतन.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ६५ 

सध्याचे जीवनच मुळी अनैसर्गिक आहे. जीवशास्त्राशी विसंगत आहे. संघर्षहीन जीवन हे खरे सुखी जीवन नव्हे. घरासाठी, मुलाबाळांसाठी काही माया ठेविली पाहिजे, अशांसारखे गंभीर प्रश्न या जीवनात उद्भवतच नाहीत. स्वीडनमधील अतिनियोजन, अतिरिक्त अनुदानपद्धती यामुळे मनुष्याला स्वतः काही चिंतन, निर्णय करावेच लागत नाहीत. वैवाहिक जीवनात किंवा इतर बाबतीत जरा कोठे खुट्ट झाले की, लोक आत्महत्या करतात. याचा अर्थ हाच की, झगडण्याची, टक्कर देण्याची, त्यांना कधी सवयच नसल्यामुळे, शीतोष्ण सोसण्याची त्यांच्या ठायी शक्तीच नसते." कल्याणकारी राज्याचे अभ्यासक आज म्हणत आहेत की या जीवनात जी सुरक्षितता, जी शाश्वती लाभते तिच्यामुळे, त्यांतील चढउतार लोपले आहेत. ते एकसुरी, साहसहीन, साचेबंद झाले आहे. आज सर्व जगातल्या या स्वैराचारी तरुणांची एकच तक्रार आहे, ―― निरुद्योग ! नीरस, कंटाळवाणे आयुष्य! त्यात काही रस यावा म्हणून ही अनन्वित कृत्ये ते करतात. जीवनाला काही उद्दिष्ठच नाही, मग त्यात रस यावा कसा ?
 खून, जाळपोळ, स्वैराचार यांहून जीवनात रस निर्माण करण्याचा आणखी एक मार्ग या निरुद्योगी तरुणांना सापडला आहे. 'एल. एस. डी!' नव्या प्रकारची अफू ! गेल्या वीस वर्षात पाश्चात्त्य देशांत मादक द्रव्यांची व्यसने वाढत आहेतच. त्यांत आता हे एक नवे द्रव्य आले आहे. पण ते आले ते मोठ्या इतमामाने आले आहे. याच्या सेवनाने समाधिसुख मिळते, ब्रह्मानंदाचा अनुभव येतो, या लोकातच स्वर्ग दिसतो, अशी त्याची जाहिरात त्याचे पुरस्कर्ते करीत असतात. आपल्याकडे गांजा, भांग याची वर्णने त्यांचे सेवन करणारे लोक अशीच करीत असतात. यांचे सेवन करून कायम धुंदीत व तंद्रीत राहणाऱ्या गोसाव्यांचे व साधूंचे अनेक पंथ भारतात : प्राचीन काळापासून आहेत. आता पाश्चात्त्य देशांत असे पंथ स्थापन होत आहेत. 'हिप्पी' हा त्यांपैकीच एक होय. अमेरिकेत बहुतेक सर्व शहरांत या पंथाच्या वसाहती आहेत. युरोपातही दहा- बारा नगरांत यांचा प्रवेश झाला आहे. घरेदारे सोडून हजारो मुले व मुली या वसाहतीत येऊन राहतात व तेथे अनन्वित कृत्ये करतात. 'एलएसडी' बरोबर 'अँफेटामाइन' हे दुसरे एक द्रव्य त्यांना सापडले आहे. याची विक्री करून त्यांना खूप पैसा मिळतो व स्वतः तीही नित्य त्या तारेत राहतात. आतापर्यंत हिरोइन, अफू, चरस ही द्रव्ये विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्या युरोप-