पान:माझे चिंतन.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६४ माझे चिंतन

करावयाचे आहे, अशा तऱ्हेची जबाबदारी मनुष्याच्या शिरावर असली तरच तो कष्ट करतो संयम करतो, वाटेल ती झीज सोसतो व प्रसंगी आत्मबलिदानही करतो. समाजवादी समाजरचना आणि कल्याणकारी राज्य यांनी आपल्या नागरिकांना या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त केले आहे. मूल जन्माला येताच अनुदान सुरू होते. त्याच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी शासनावर असते. त्याचा रोजगार निश्चित आहे. घरातल्या सर्व माणसांना वैद्यकीय मदत मोफत मिळते. रुग्णालयाचाही खर्च नाही. म्हातारपणाची सर्व व्यवस्था शासनच करते ! मग प्रपंचातील कर्त्या पुरुषावर जबाबदारी कसली ? इतर देशांत शिक्षण चालू असतानाच विद्यार्थ्यांच्यावर जबाबदाऱ्या येऊन पडतात. आपली धाकटी भावंडे, आपले मातापिता यांची जबाबदारी हळूहळू आपल्यावर येणार आहे, ही जाणीव त्या वयातच त्यांच्या ठायी निर्माण होते. अनेकांना स्वतःचे शिक्षणही स्वतःच करावे लागते. या कौटुंबिक कर्तव्याचीही आच समाजवादी समाजरचनेत आणि कल्याणकारी राज्यात मनुष्याच्या मनाला नसते. मग समाजऋणाची आच कोटली ? समाजाची सर्व जबाबदारी शासनाने उचललेलीच असते ! निसर्गतः मनुष्याच्या वासना फार प्रबळ असतात. त्यांना स्वैर सोडावे, वाटेल ते करून त्या शमवाव्या, बंधन कसलेही मानू नये ही त्याची मूळ प्रवृत्ती असते. असा हा मनुष्य या वासनांवर नियंत्रण घालावे, संयम करावा, त्याग करावा, हे कुटुंबात व समाजात शिकतो. या संबंधीचा काही ध्येयवाद त्याच्या मनात निर्माण झालेला असतो. काही उच्च आकांक्षा त्याला असतात. या सर्वांची मूळ प्रेरणा आई, बाप, बहीण, भाऊ, आप्त, स्नेही, शेजारी, गोत यांच्यासाठी काही करावे, या इच्छेत असते. समाजवादी समाजरचनेत ही प्रेरणाच नष्ट होते. आणि मग निग्रह, संयम कशासाठी असा प्रश्न येऊन सर्व संस्कृतीचा, प्रगतीचा हेतूच नष्ट होतो. मग मनुष्य विशेषतः तरुण स्त्री-पुरुष स्वैर होतात व अक्षरशः नंगा नाच घालू लागतात. सामान्य माणसाना मोठमोठी ध्येये पेलत नाहीत. आपल्या कुटुंबीयांचे भरणपोषण करावे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. तेच नष्ट झाल्यामुळे त्यांचे जीवन अर्थशून्य झाले आहे.

नीरस जीवन

 या सर्वांचा कळस सध्या स्वीडनमध्ये झाला आहे. याची कारणमीमांसा करताना तेथील एक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्टेन मार्टिन्स म्हणतात, "आपले