पान:माझे चिंतन.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ६३ 

क्वचित असे वाटते की, त्याहूनही ही लक्षणे भयंकर आहेत. कारण सामान्यतः प्रौढ, सज्ञान, तिशी-पत्तीशी चाळिशीचे लोक गुन्हे करतात. पण सध्या रि-ओ-डी जानेरो येथील बालगुन्हेगारांचे न्यायाधीश डॉ. गुसमाओ यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रौढांचे गुन्हे आज तरुण व बाल जास्त करीत आहेत. कल्पान्ताच्या लक्षणाहून हे लक्षण खचित निराळे आहे आणि दुसरे म्हणजे ही गुन्हेगारी श्रीमंत, सुविद्य, सभ्य गणलेल्या कुटुंबातील मुलांमुलींची आहे. समृद्ध देशात आज एकच प्रश्न पुनःपुन्हा विचारला जात आहे, आईबाप कपाळावर हात मारून तो विचारीत आहेत- 'अहो, या मुलींना काय कमी होते म्हणून या चोऱ्या करतात, आणि देहविक्रय करतात ?' 'अहो, ही मुले सहजासहजी सुरामारीस का प्रवृत्त होतात, यांची वये झाली की काय म्हणून यांनी भेटेल त्या मुलीवर बलाकार करावा ?' हेही लक्षण कल्पान्त लक्षणाहून निराळे आहे. म्हणूनच जगातले विचारवंत यांची कारणे शोधण्यात, उपपत्ती बसविण्यात अहोरात्र मग्न झालेले आहेत. ते विचारवंत काय म्हणतात ते आता पाहू.

जबाबदारीतून मुक्त

 श्रीमंत संपन्न देशात बालतरुणांचा हा जो अधःपात झाला आहे त्याचे, या विचारवंतांच्या मते, पहिले कारण म्हणजे समाजवादी समाजरचना हे होय. हे विधान प्रथम कानाला मोठे विचित्र वाटते. पण त्यामागची विचारसरणी ध्यानात आली म्हणजे त्याविषयीचे आश्चर्य लोपून त्यातील सत्यता स्पष्ट दिसते आणि हे आधीच आपल्या ध्यानात यावयास हवे होते, असे वाटू लागते. 'बेजबाबदार' या शब्दाचा मूळ अर्थ आपण ध्यानी घ्यावा. ज्याच्या शिरावर कसलीही जबाबदारी नाही, कर्तव्याचा भार नाही, त्यामुळे ज्याच्यावर कसलीही बंधने नाहीत, आणि म्हणूनच ज्याच्या वागण्याला कसलेही ताळतंत्र नाही, असा मनुष्य, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. मनुष्य कार्यप्रवण होतो, कष्ट करतो, चिंता वाहतो, परिस्थितीशी झगडा करतो; काही मनोनिग्रह, संयम करतो; आपल्या काही भुका मारतो, वासना दडपतो, हे केव्हा घडते ? त्याच्यावर काही जबाबदारी असेल तर ! बायकामुलांचे पोषण करावयाचे आहे, रक्षण करावयाचे आहे, त्यांच्या व स्वतःच्या पुढील आयुष्याची तरतूद करावयाची आहे, यांतून वेळ, शक्ती, धन शिल्लक राहिल्यास काही सामाजिक कार्य करावयाचे आहे, आपल्या बांधवांना साह्य