पान:माझे चिंतन.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६२ माझे चिंतन

वरून रक्तपात केला. हे सर्व तरुण स्कूटरवरून मोटारसायकलवरून आले होते. त्यांतील बहुतेक सुशिक्षित मध्यम वर्गातून आले होते. हा वर्ग इतके दिवस सौजन्य, सभ्यपणा, कायदापालन यासाठी नावाजला होता. आता पाशवी अत्याचार, स्वैरसंभोग, नीतिभ्रष्टता ही आक्काबाई या वर्गात शिरत आहे. १९६३ साली या वर्गातील बालवयी गुन्हेगारांनी जवळ जवळ ४ कोटी रुपयांची मालमत्ता जाळून पोळून टाकली. कल्याणकारी राज्याला हे अगदी लांच्छनास्पद आहे असे 'गार्डियन' या पत्राने म्हटले आहे. पण समृद्धीचे हेच लक्षण सर्वत्र होऊ पाहात आहे. समृद्धीचा हा शापच आहे असे सर्वत्र दिसत आहे.
 या श्रीमंत देशांत स्वैरसंभोगाला तर कसली मर्यादाच राहिलेली नाही. बेल्जममधील एक मॅजिस्ट्रेट म्हणतात की, चौदा वर्षांच्या आतील मुला-मुलींत इतका अनाचार चालतो की, पुष्कळ वेळा आपण कितीजणांशी संगत झालो हेही त्यांना आठवत नसते ! ऑस्ट्रेलियातील सिडने विद्यापीठातील पुरुष विद्यार्थी नृत्यसमयी पुष्कळ वेळा पूर्ण नग्न होऊन नाचतात. तेरा ते सतरा वयाच्या ३०० मुली पोलिसांनी पकडल्या होत्या. त्यांतील २४० जणांनी किमान ५० वेळा तरी समागम केला होता. कॅनडातील १८ ते २१ वर्षांच्या मुलांची गुन्हेगारी गेल्या ५ वर्षात २१ टक्क्यांनी वाढली आहे. टोरंटो येथील शाळांना विद्यार्थ्यांनी केलेल्या विध्वंसापायी दरसाल सव्वा कोटी रुपयांचा भुर्दंड बसतो. साऊथ आफ्रिका, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, मेक्सिको, ब्राझील येथील तरुणांच्या अत्याचारांची कहाणी सांगून दरवेळी लेखक म्हणतो की, राहणीमान व बालगुन्हेगारी यांची वाढ सम वेगानेच चालली आहे. व्यभिचार, गर्भपात, देहविक्रय, आत्महत्या, जाळपोळ, मारामारी, रक्तपात हे गुन्हे हेच जणू प्रगत देशांचे लक्षण होत आहे. एक युरोपीय समाजसेवक कडवटपणे म्हणाला, आज बालतरुणवयीन ठगडाकूंचे विपुल प्रमाण दाखविल्यावाचून आमचा देश प्रगत आहे, असा दावा कोणत्याच देशाला करता येणार नाही !
 जगाचे आणि त्यातील बाल-तरुणांचे हे चित्र अत्यंत विकट आहे. घोरदर्शन आहे. कोणत्याही विचारी माणसाची झोप उडून जावी इतके ते विपरीत व अशुभ आहे. जगातील प्रत्येक देशाच्या समाजधुरीणांची झोप खरोखरच आज उडून गेली आहे. भूकंपाचे धक्के काहीच नव्हेत, असे हे धक्के आहेत. पुराणात कल्पान्त जवळ आल्याची जी लक्षणे सांगितली आहेत तीच ही असे पुष्कळांना वाटते.