पान:माझे चिंतन.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ६१ 

यासंबंधीची सविस्तर माहिती देऊन शेवटी म्हटले आहे की, अमेरिका हा देश या गुन्हेगारीमुळे विनाशाच्या कडेवर येऊन ठेपला आहे. या गुन्हेगारीतील जास्त भयावह गोष्ट म्हणजे अनेक राजकारणी पुढारी, मुत्सद्दी, अधिकारी या ठगांना सामील असतात व त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे संरक्षण करतात! यासाठी हे डाकू आपल्या धंद्यात त्या राजकीय पुढाऱ्यांची पाती खुबीने ठेवतात!
 माफिया या नावाची या डाकूंची संस्था असून तिचे जाळे जगभर पसरलेले आहे. जुगार, कुंटणखाना, मादक द्रव्यांची चोरटी आयात हे धंदे तर ती करतेच, पण याशिवाय आकड्यांच्या जुगारावर ती दरसाल ५०० कोटी डॉलरची उलाढाल करते. १९६२ साली मोरायरिटी या कुविख्यात डाकूला पकडले तेव्हा त्याच्याजवळ २४ लक्ष डॉलरच्या नोटा सापडल्या. डेट्राइट येथील गोथाम हॉटेलवर पोलिसांनी छापा घातला, तेव्हा त्या एका हॉटेलात दरसाल २ कोटींचा जुगार चालतो, असा हिशेब सापडला. रोज दोन कोटी अमेरिकन नागरिक या माफियाच्या आकड्यावर पैसे लावतात, आणि श्रमाने मिळविलेला पैसा कोटीच्या राशीने त्या डाकूंना मिळवून देतात. एवढा अवाढव्य धंदा, पोलिसांच्या पकडीत न सापडता करणारे लोक किती सावध, किती दक्ष, किती कार्यक्षम असले पाहिजेत आणि पोलीस, अधिकारी, न्यायाधीश व राजकारणी पुढारी त्यांना किती सामील असले पाहिजेत याची सहज कल्पना येईल. नॅशनल शेरीफ असोसिएशनपुढे भाषण करताना डॉ. रूथ अलेक्झांडर या पंडितेने म्हटले आहे की, "आपल्या देशाचे राहणीमान सर्व जगात उच्च आहे. पण आपल्या गुन्हेगारीचे मानही तितकेच उच्च आहे."

प्रगतीचे लक्षण !

 जोफ्रे लूसी याने निरनिराळ्या देशांतील वर्तमानपत्रांतील माहिती जमा करून सध्या जगातील बाल तरुण मुले-मुली कोणत्या दिशेने वाहवत चालली आहेत सांगितले आहे. त्याच्या प्रत्येक परिच्छेदाचे पालुपद हेच आहे की कल्याणकारी राज्य, त्यामुळे येणारे उच्च राहणीमान आणि गुन्हेगारीची वाढ ही सांगातीच वाटचाल करीत आहेत. समृद्धी आली की पाठोपाठ गुन्हेगारी, विशेषतः बाल- तरुण गुन्हेगारी आलीच. ब्रिटनचे उदाहरण पाहा. १९६४ च्या एप्रिलांत ८०० तरुण मवाली व त्यांच्या ४०० मैत्रिणी यांनी क्लॅक्टन, ऑस्टेंड या गावी नानाप्रकारचे अत्याचार केले. घरांतील हॉटेलांतील सामानाची मोडतोड केली. नोकरांना मारले व मुलींच्या