पान:माझे चिंतन.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६० माझे चिंतन

जाते. रेल्वे, पॉवर स्टेशन्स, टेलिफोन, टेलिग्राफ, फॉरेस्ट, इंडस्ट्रीज, मद्य, तंबाखू खाणी, बांधकाम या सर्ववांर तेथे आज शासकीय मालकी आहे. राहिलेल्या सर्व उद्योगांवर शासनाचे नियंत्रण आहे. यातून सरकारला जे धन मिळते त्याचा विनियोग नागरिकांना सुख-समृद्धी उपलब्ध करून देण्याकडेच होत असतो. प्रत्येक मुलामागे मातेला वर्षाकाठी चारशे रु. मिळतात. शाळेत दुपारी सर्व विद्यार्थ्यांना जेवण मोफत मिळते. विद्यापीठाचे शिक्षण सर्वांना विनाशुल्क मिळते. वैद्यकीय खर्चापैकी पंचाहत्तर टक्के खर्च सरकार देते. रुग्णालयात सर्वांना उपचार फुकट असतात. वृद्धांना पेन्शन व सुखसोयी पुरेशा मिळतात. अनाथ, पंगू लोकांच्या उपजीविकेची सर्व जबाबदारी शासन घेते. या सर्वामुळे स्वीडनला भूवरील नंदनवन असे म्हणतात. निदान दहा एक वर्षापूर्वीपर्यंत तरी म्हणत होते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, या ऋद्धि-सिद्धीच्या बरोबरच स्वीडनमध्ये आक्काबाईनेही प्रवेश केला आहे, हे आता सर्वांच्या ध्यानात येत आहे. गेल्या १७ वर्षांत तेथील गुन्हेगारी दुपटीने वाढली आहे. खून व दरोडेखोरी ८० टक्यांनी वाढली आहे. स्त्रियांवर शे. २८ टक्के जास्त बलात्कार होतात. मद्य व मादक द्रव्यांचे सेवन तर साथीच्या रोगासारखे पसरत आहे. आत्महत्येचे प्रमाण सारखे वाढत चालले आहे. आणि सर्वात उद्वेगकारक म्हणजे १५ वर्षाच्या आतील मुलांत गुन्हेगारी तिपटीने वाढली आहे.

संघटित गुन्हेगारी

 अमेरिकेच्या समृद्धीला सर्व जगात तोड नाही. पण त्याचबरोबर तेथल्या गुन्हेगारीलाही सर्व जगात तोड नाही. अमेरिकेतल्या गुन्हेगारीचा विशेष हा की, ती गुन्हेगारी संघटित आहे. टोळी करून दरोडेखोर नेहमीच राहतात. पण त्यांची टोळी पन्नासशंभर माणसांची व एखाद्या लहानशा तालुक्यापुरती मर्यादित असते. अमेरिकेतला गुन्हाव्यवसाय एखाद्या बँकेच्या किंवा उद्योगकंपनीच्यासारखा चालतो. त्याची मुख्य शाखा एके ठिकाणी व सर्व देशभर उपशाखा असतात; तसेच येथील ठगव्यवसायाचे आहे. कुंटणखाने, जुगारअड्डे, मादक द्रव्यांची विक्री, मुले-माणसे खंडणीसाठी पळविणे, दहशत घालून पैसे उकळणे हे या गुन्हेगारांचे मुख्य धंदे असून त्यासाठी खून, जाळपोळ, विध्वंस, बलात्कार, अत्याचार हे करण्यास ते मुळीच मागेपुढे पाहात नाहीत. केफाव्हर नावाच्या सीनेटरने