पान:माझे चिंतन.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समृद्धीचा शाप ५९ 

व उत्साहही नसतो. पण समाजवादी समाजरचना येऊन पुरेसे अन्नवस्त्र चार तासांच्या श्रमांनीच मिळू लागल्यावर साहजिकच मनुष्य राहिलेला वेळ संस्कृति- संवर्धनात घालवील, अशी अपेक्षा होती.
 मार्क्सची शासनाविषयीची आणि 'चार तासांचा दिवस' या कल्पनेविषयीची एकांतिक मते कोणालाच मान्य झाली नाहीत हे खरे. पण सर्वसामान्यतः दारिद्र्यामुळे मनुष्य गुन्हेगारीस, दुसऱ्याच्या धनाच्या अपहारास प्रवृत्त होतो, दारिद्र्यामुळेच तो चोर-दरोडेखोर बनतो, हे मत सर्वांना सयुक्तिक वाटत होते. कारण दारिद्र्य हे पापप्रवृत्तीचे प्रधान कारण होय हे प्राचीन काळापासून सर्वांनाच मान्य होते व आजही प्रत्यक्षात तसे दिसत होते. त्यामुळे अपार समृद्धी येऊन सर्वांना गरजेपुरते अन्नवस्त्र मिळू लागले की गुन्हेगारीला खूपच आळा बसेल, समाजातली निम्मी-पाऊण गुन्हेगारी घटेल हा विचार सर्वानाच पटत होता.

विपरीत अनुभव

 पण प्रत्यक्षात अनुभव मात्र अत्यंत विपरीत असा आला. पाश्चात्त्य देशांत, विशेषतः अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जम, जर्मनी या देशांत आज खरोखरीच समृद्धी आलेली आहे, आणि या सर्व देशांत समाजवादी समाजरचना अवतरली नसली तरी कल्याणकारी शासने तेथे निश्चित स्थापन झाली आहेत. या देशांत अन्नवस्त्रालाही महाग असे लोक फारच थोडे, जवळजवळ नाहीतच. पूर्वीच्या मानाने पाहता त्यांची संख्या आज नगण्यच आहे. अमेरिकेत तर आज ऋद्धि- सिद्धी अवतरल्यासारखे झाले आहे. आणि इंग्लंड, स्वीडन येथे समाजवादी समाजरचनाही अस्तित्वात आली आहे. प्रारंभीच्या सिद्धान्तान्वये पाहता या देशांत गुन्हेगारीचे समूळ निर्मूलन होणे, निदान तिला पुष्कळ आळा बसणे अवश्य होते. पण तसे तर झालेले नाहीच; उलट या देशांत गुन्हेगारी अगदी भयानक प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि काही पंडितांनी तर ही गुन्हेगारी आणि समृद्धी यात कार्यकारण संबंध आहे, गुन्हेगारी हा समृद्धीचा शाप आहे, असे मत मांडले आहे. श्रीमंत देशांतले हे दृश्य इतके विपरीत आहे की, जगातले विचारवेत्ते हादरून जाऊन, मूढ होऊन त्याकडे बघत राहिलेले आहेत.

लक्ष्मी व आक्काबाई

 समाजवादी समाजरचना स्वीडनमध्ये आज पूर्ण झाली आहे, असे मानले