पान:माझे चिंतन.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ५८ माझे चिंतन


समाजवादी समाजरचना

 साठ-सत्तर वर्षापूर्वी मार्क्सवादाचा सर्वत्र विशेष प्रभाव पडू लागल्यानंतर गुन्हेगारीची मीमांसा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली; आणि धनसाधने हीच सर्व क्षेत्रांत निर्णायक होत, असा मार्क्सचा सिद्धान्त असल्यामुळे दारिद्रय, गरिबी हीच सर्व प्रकारच्या पापाला कारण असते, हे मत फार प्रभावीपणे मांडले जाऊ लागले. त्यानंतर गुन्हेगारीचे विवेचन जास्त शास्त्रीय पद्धतीने होऊ लागले, आणि सध्याच्या दारिद्र्याला व पर्यायाने गुन्हेगारीला भांडवलशाही हीच कारणीभूत आहे, असा निष्कर्ष त्यातून निघाला व तोच हळूहळू सर्वमान्य झाला. अर्थातच भांडवलशाही हीच या सर्व अनर्थाला कारण असेल तर ती नष्ट करून समाजवादी समाजरचना स्थापन करणे हा त्यावर उपाय होय, हा विचार ओघानेच प्राप्त झाला. जमिनी, कारखाने, खाणी, अरण्ये, ही जी धनोत्पादनाची साधने, ती समाजाच्या- म्हणजे सरकारच्या मालकीची करणे हे समाजवादी समाजरचनेचे मुख्य लक्षण. तशी ती मालकीची झाली की, त्या उद्योगातून मिळणारा नफा भांडवलशाहीऐवजी सरकारला- म्हणजेच समाजाला मिळेल, त्याचे दारिद्र्य नष्ट होईल व मग अर्थातच गुन्हेगारीला आळा बसेल, ही विचारसरणी प्रचलित झाली व तिला सर्व सुशिक्षित जगाची मान्यता मिळाली.
 या समाजवादी समाजरचनेमुळे सर्व पापप्रवृत्ती, सर्व गुन्हेगारी नष्ट होईल, अशी मार्क्सची श्रद्धा इतकी दृढ होती की, ती अमलात आल्यानंतर सरकार ही संस्था नष्ट होईल, तिची गरजच राहणार नाही, असे भविष्य त्याने वर्तविले होते. त्याने आणखी असेही सांगितले होते की, शास्त्रांची वाढ झाली, तंत्रविज्ञान प्रगत झाले की उत्पादन इतके वाढेल, समृद्धी इतकी येईल की कोणत्याही मनुष्याला दिवसातून चार तासांपेक्षा उपजीविकेसाठी जास्त काम करण्याची गरज राहणार नाही. मग राहिलेल्या वेळात माणूस काय करील ? तो कला, साहित्य, विज्ञान यांच्या अभ्यासाने तो वेळ कारणी लावील आणि त्यामुळे समाजाच्या संस्कृतीची पातळी उंचावेल, असे मार्क्सचे मत होते. आज अन्नवस्त्रासाठी सोळा- अठरा तास माणसाला काम करावे लागत असल्यामुळे कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा ही धनिकवर्गाची मिजास आणि मक्तेदारी होऊन बसली आहे. या संस्कृतिसाधनांची उपासना करण्यास कष्टकरी वर्गाला वेळच नसतो आणि शक्ती