पान:माझे चिंतन.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






समृद्धीचा शाप






 मनुष्य गुन्हा का करतो, पापाचरणास का प्रवृत्त होतो याची प्राचीन काळापासून धर्मशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, राजकारणी हे मीमांसा करीत आलेले आहेत. अतृप्त वासना, लोभ, मोह हे सर्व प्रकारच्या पापांमागे कारण असतात असेच मत बहुतेक सर्व शास्त्रज्ञांनी दिलेले आहे. 'बुभुक्षितः किं न करोति पापम् ?' हे वचन प्रसिद्धच आहे. भावार्थ असा की, माणसांची कोणतीही भूक शमली नाही की, तो ती शमविण्यासाठी वाटेल ते पाप करतो. सामान्यतः धनलोभ, स्त्री-मोह व सत्तालोभ याच वासना सर्वत्र प्रबल असतात आणि त्यातील धनलोभ हाच मनुष्याला जास्तीकरून गुन्हा करण्यास प्रवृत्त करीत असतो. कामवासना ही कमी प्रबळ असते असे नाही. पण तिचा काही तरी उपशम नित्याच्या संसारातच व्हावा अशी सोय असते. सत्तालोभ फार भयंकर असतो. पण बहुसंख्य लोक यापासून मुक्त असतात. कारण त्यांना नित्याच्या विवंचना खूप असतात. धनलोभ मात्र सर्वव्यापी आहे; आणि त्याच्या तृप्तीत खोट आली की, दुसरा काही इलाजच चालत नाही. म्हणूनच 'दारिद्र्यं इति यत् प्रोक्तं पर्यायमरणं ही तत् ।' दारिद्र्याला पर्यायी शब्द मरण हाच आहे 'दरिद्रं पातकं मन्ये' । 'अर्थस्य पुरुषो दासः ।' 'अन्नाची भ्रान्त यासारखी पापी अवस्था दुसरी नाही,' 'मृतो दरिद्रः पुरुषः ।' इ. वचने जुन्या ग्रंथांत जागोजाग आढळत असतात. तेव्हा दारिद्र्य हेच सर्व गुन्हेगारीच्या बुडाशी कारण आहे, असा मागल्या काळच्या बहुतेक सर्व शहाण्या पुरुषांनी सिद्धान्त केला होता, असे दिसते.