पान:माझे चिंतन.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ५६ माझे चिंतन

भांडारकर, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, केळकर, राजवाडे, वैद्य, केतकर, सावरकर, माटे, जावडेकर ही नाममालिका वर सांगितलीच आहे. प्रश्न असा आहे की आज त्यांच्या तोडीचा ग्रंथकार कोण आहे ? वास्तविक त्यांच्या अलौकिक प्रेरणेने महाराष्ट्रात ग्रंथकर्तृत्वशक्तीचा विकास होऊन त्या वेळच्या मानाने दसपट ग्रंथकार या भूमीत निर्माण व्हावयास पाहिजे होते. तसे तर झाले नाहीतच, उलट ती महान परंपरा लोप पावते की काय अशी दारुण शंका मनाला आज त्रस्त करीत आहे. म्हणून वाचकांना विनंती अशी की वेळीच सावध होऊन या महाशक्तीची उपासना त्यांनी आरंभावी. आणि तिला प्रसन्न करून घेऊन भारताच्या लोकसत्तेपुढे येऊन पडलेल्या बिकट समस्या सोडविण्यास साह्य करावे.