पान:माझे चिंतन.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ५५ 

आहे. जुन्या स्मृती रद्द करून 'आमच्या स्मृती आम्ही रचणार' हे त्यांचे स्वप्न आज आपण खरे केले आहे. बालविवाहाचा त्यांना भयंकर संताप असे. त्यापेक्षा सती बरी, असे त्यांनी एका लेखात वैतागून लिहिले आहे. आज बालविवाह कायद्यानेच म्हणजे नव्या स्मृतींनीच रद्द केला आहे. जातिभेद, कलियुग, व्यक्ति- स्वातंत्र्य, लोकसत्ता, धर्मातील कर्मकांड या सर्व विषयांत आज आपण आगरकरांचे अनुयायी झालो आहोत. त्यांच्या ग्रंथाची सत्ता ती हीच होय. महाराष्ट्राचा गेल्या पाऊणशे वर्षांचा इतिहास पाहिला तर निबंधमाला, केसरी व सुधारक या तीन ग्रंथराजांचीच सत्ता येथे प्रस्थापित झाली आहे व अजूनही लोकमत ती सत्ता आनंदाने मान्य करीत आहे असे आपणांस दिसून येईल.
 ग्रंथ ही एक महाशक्ती आहे हा विचार वाचकांना पटवून द्यावा यासाठी एवढा प्रपंच केला. त्यांना तो पटला असेल तर या महाशक्तीची उपासना करण्यास त्यांनी तत्काळ प्रारंभ केला पाहिजे. अजून आपल्यापुढे कामाचे पर्वतच्या पर्वत पडले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, इहलोकनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा ही तत्त्वे गेली शंभर वर्षे आपल्या कानांवर पडत असली तरी भारतातील बहुसंख्य जनतेच्या चित्तात अजून ती रुजलेली नाहीत. जातीयता, प्रांतीयता ही विषे अजून समाज-मनात किती प्रबळ आहेत याचा प्रत्यय आपल्याला वरचेवर येत असतो. कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली तरी प्रत्यक्षात ती किती प्रभावी आहे हेही वरचेवर दिसून येतच आहे. बालविवाहाची तीच स्थिती आहे. खेड्यापाड्यांतून हजारो बालविवाह अजूनही दरसाल होतच असतात. खेड्यापाड्यांत लोकशाही आल्यामुळे तेथे गुंडांचे राज्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार करण्याचे व्यक्तित्वाचे सामर्थ्य अजून आपल्या समाजात अवतीर्ण झालेले नाही. आणि ते झाले नाही तोपर्यंत आपली लोकसत्ता यशस्वी होणे अशक्य आहे. म्हणून युरोपात जी धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक क्रान्ती झाली, जी युगपरिवर्तने गेल्या पाचशे वर्षांत झाली, ती पुढील पन्नास वर्षांत येथल्या बहुजनसमाजात घडवून आणणे हे अति दुर्घट कार्य आपल्यापुढे आहे आणि ग्रंथ या महाशक्तीच्या उपासनेवाचून ते साधणे कदापि शक्य नाही.
 या क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक दुर्दैवी उणीव वाचकांच्या नजरेस आणू इच्छितो. रानडे, विष्णुशास्त्री यांच्यापासून पुढील चाळीस-पन्नास वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रात युगपरिवर्तन घडवितील असे अनेक ग्रंथकार झाले. रानडे, तेलंग,