पान:माझे चिंतन.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ५४ माझे चिंतन

अशा राजसत्ता होत्या. भारतात व्यक्तिस्वातंत्र्याचा असा बळी दिला जाऊ नये ही आगरकरांची चिंता होती. आणि त्यासाठी सुधारकाच्या पहिल्या अंकापासून त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा अत्यंत जोरदार पुरस्कार करण्यास प्रारंभ केला. आपला समाज चतुर्विध शृंखलांनी जखडलेला होता. 'वेदप्रामाण्य' ही पहिली शृंखला. शेकडो वर्षे या देशात बुद्धिप्रामाण्याला, मानवी बुद्धीला स्वतंत्र विचार करण्यास अवसरच नव्हता. येथे भौतिक जीवनाचे, ऐहिक व्यवहाराचे तत्त्वज्ञान सांगणारे ग्रंथ निर्माण झाले नाहीत, त्याचे हे प्रधान कारण आहे. 'कर्मसिद्धांत' ही दुसरी शृंखला. पूर्वजन्माच्या कर्मांनी प्रत्येक माणूस बद्ध आहे. त्याची बुद्धीसुद्धा कर्मानुसारिणी आहे, तिला सद्विचार सुचणे हे सुद्धा पूर्वकर्मावर अवलंबून आहे, असे हे तत्त्व आहे. 'जाति' ही तिसरी शृंखला होय. अमक्या जातीत जन्मलेल्याने अमकाच व्यवसाय केला पाहिजे, असाच आचार केला पाहिजे असा अत्यंत क्रूर दण्डक या देशात हजारो वर्षे जारी होता. त्यामुळे येथे लक्षावधी लोकांच्या कर्तृत्वाची हत्या झाली. चौथी श्रृंखला म्हणजे 'काला' ची होय. आपण कलियुग- कल्पना शतकानुशतके उराशी धरून बसलो होतो. कलियुगात असेच घडणार, अधःपात होणारच, धर्म लयाला जाणारच, अविंधाचे राज्य होणारच, आपल्या हाती काही नाही, असे तत्त्वज्ञान येथल्या समाजात दृढमूल झाले होते. आगरकरांना सर्वत्र असे पारतंत्र्य, गुलामगिरी, बौद्धिक दास्य हे दिसत होते. भारतीयांची बुद्धी या शृंखलांनी अगदी जखडून गेल्यामुळे येथील समाज अत्यंत दीन अवस्थेला गेलेला त्यांना दिसत होता. सुधारकाच्या पहिल्या लेखापासून त्यांनी या शृंखलांवर घणाचे घाव घालण्यास प्रारंभ केला आणि 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही', 'मूळ पाया चांगला पाहिजे', 'आमचे काय होणार ?' असे निबंध लिहून त्या तोडून टाकण्याचा आमरण प्रयत्न चालविला, 'हातातून लेखणी गळून पडेपर्यंत सुधारक आपले व्रत सोडणार नाही,' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती व ती शब्दश: पाळली. आगरकरांना अकाली मृत्यू आल्यामुळे भारताच्या बुद्धीला जखडणाऱ्या शृंखला प्रत्यक्षात तुटून पडलेल्या पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. पण त्या पुढच्या काळात तुटून गेल्या आणि आज आपल्या मनावर त्यांच्या 'सुधारक' या ग्रंथराजाचीच सत्ता आहे, हे आपल्याला सहजच मान्य होईल. स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे, पुरुषांना देण्यात येते तेच दिले पाहिजे आणि तेही एकत्र दिले पाहिजे हा त्यांचा आग्रह आपण आज अक्षरशः अमलात आणला