पान:माझे चिंतन.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ५३ 

अखिल भारतातील संतमंडळ यांनी, संसार असार आहे, हे सांगून भारतातील इहलोकनिष्ठा नष्ट केली होती. भारतीय कर्तृत्वाला अनेक शतके मरगळ आली होती ती त्यामुळेच होय. पाश्चात्त्य विद्या येथे प्रसृत होऊ लागली तसतशी आपली निवृत्तीवरची श्रद्धा ढळत चाललीच होती. टिळकांनी, ज्या गीतेच्या साह्याने ही निवृत्ती पोसत होती, त्या गीतेचाच आधार तिच्याखालून काढून घेऊन समर्थांच्या जयिष्णु प्रवृत्तिवादी महाराष्ट्र धर्माचे पुनरुज्जीवन केले.
 पण टिळकांचे खरे कार्य म्हणजे भारतात लोकशक्ती निर्माण करणे हे होय. त्यांनी निर्माण केलेली नवी सृष्टी ती हीच होय. चाळीस वर्षे त्यांचा 'केसरी' हा ग्रंथराज ह्या अलौकिक अभिनव सृष्टीची रचना करीत होता; त्याच काळात काव्हूर, बिस्मार्क, सन् यत् सेन, प्रिन्स इटो इ. राष्ट्रपुरुषांनी इटली, जर्मनी, चीन, जपान या देशांत राष्ट्रसंघटना केली. पण त्यांनी राजसत्ता, सरंजामी सरदारसत्ता, लष्करी सामर्थ्य, भांडवली शक्ती यांचा उपयोग या कार्यासाठी केला. टिळकांनी भारतात लोकशक्तीचा अवलंब करावयाचा असे प्रारंभापासूनच निश्चित केले होते. या सर्व थोर पुरुषांनी ज्या साधनांनी राष्ट्रसंघटना केली त्यांची तुलना आपल्या दृष्टीने उद्बोधक होईल. राजसत्तेचे बळ कोणाच्या पाठीशी होते, कोणी लष्करी सामर्थ्य वापरले, कोणी भांडवली शक्तीचा अवलंब केला. टिळकांचे साधन कोणते ? फक्त लेखणी ! ग्रंथप्रसवा लेखणी ! त्या पुरुषांची राष्ट्रे ३-४ कोटी संख्येची, त्यांचे क्षेत्रफळ २ लाख- ३ लाख चौरस मैल. टिळकांचे कार्यक्षेत्र ३० कोटींचा समाज व १८ लक्ष चौरस मैलांचा देश ! पण इतिहास अशी ग्वाही देतो की 'केसरी' या ग्रंथराजाने निर्माण केलेली लोकशक्ती हीच फार प्रभावी ठरली.
 आगरकरांचा ग्रंथराज म्हणजे 'सुधारक' हा होय. राष्ट्रीय अहंकार जागृत होऊन लोक संघटित होऊ लागले म्हणजे त्या संघटित, सामाजिक शक्तींपुढे व्यक्ती ही निष्प्रभ ठरण्याची फार मोठी भीती असते. आणि व्यक्ती निष्प्रभ झाली की संघटित, सामाजिक शक्ती दण्डसत्तेकडे झुकण्याचा संभव असतो. 'समाजासाठी व्यक्ती होय' असे तत्त्वज्ञान प्रबल होऊन व्यक्तीच्या व्यक्तित्वाची गळचेपी होते. जर्मनी, इटली येथील हिटलर- मुसोलिनींच्या दण्डसत्ता व चीन-रशियातील दण्डसत्ता यांची उदाहरणे आपल्यापुढे आहेतच. आगरकरांच्या काळी अशा सत्ता नव्हत्या. तरी जर्मनी, जपान येथे अनियंत्रित