पान:माझे चिंतन.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ५२ माझे चिंतन

फायदा होय असे त्यांनी म्हटले आहे. 'मुद्रणस्वातंत्र्य' या केसरीतल्या लेखमालेत तर त्यांनी याचे विस्तृत विवेचन केले आहे. 'देशाभिमान' या निबंधात आपल्या देशात पूर्वकाळी राजनिष्ठा का नव्हती याचे विवेचन करताना जातिभेद हे प्रधान कारण म्हणून सांगितले आहे. इहलोकनिष्ठा, ऐहिक उत्कर्षाची तळमळ हे पुनरुज्जीवनाचे फार मोठे लक्षण आहे. 'गर्व', 'इतिहास' या निबंधात विष्णुशास्त्री यांनी आपल्या निवृत्तिमार्गी जीवनावर प्रखर टीका केली आहे. कामक्रोधमदमत्सरलोभदंभ हे रिपू नसून हे मानवाचे मित्र आहेत, असे शास्त्री- बुवांनी अगदी पूर्ण इहनिष्ठ प्रतिपादन केले आहे. आपल्या देशात इतिहासाविषयी प्राचीन काळी पूर्ण अनास्था होती याचे आपली निवृत्ती हे एक कारण म्हणून विष्णुशास्त्री सांगतात. विष्णुशास्त्री यांचा लेखनसंसार अवघा आठ वर्षांचा आहे. पण तेवढ्या अवधीत इहलोकनिष्ठा, बुद्धिवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, धर्म- सहिष्णुता, ज्ञाननिष्ठा, स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश यांचे प्रेम इ. अनेक युगतत्त्वांचे विवरण त्यांनी केले आणि महाराष्ट्रीयांचा अहंकार जागृत करून लोकशाही विचारांची बीजे त्यांनी येथल्या जनमानसात रोवली.
 टिळकांनी आपल्या विविध ग्रंथांतून याच युगतत्त्वांचा पुरस्कार करून भारतात लोकशाहीला अवश्य ती लोकशक्ती निर्माण केली, हे सर्वांना विदितच आहे 'ओरायन' व 'आर्क्टिक होम' हे ग्रंथ त्यांनी केवळ इतिहास संशोधनार्थ लिहिले असे मला वाटत नाही. भारतीय संस्कृतीचे प्राचीनत्व व श्रेष्ठत्व जगापुढे सिद्ध करून भारतीय अस्मितेचा परिपोष त्यांना करावयाचा होता. आणि त्या ग्रंथांनी हे कार्य साधले यात शंका नाही. तेलंग, भांडारकर, चिंतामणराव वैद्य यांच्या ग्रंथांमुळे जगमान्य संशोधक भारतातही निपजू शकतात हे सिद्ध झाले व भारतीयांची मान उंच व ताठ झाली. ठिळकांच्या ग्रंथांमुळे या सर्वांच्या प्रयत्नांवर कलशस्थापना झाली. लोकशाहीला अवश्य जे प्रबल कणखर व्यक्तिमत्त्व त्यासाठी व्यक्तीच्या मनात प्रथम स्वाभिमानाचा पोष होणे अवश्य असते. टिळकांच्या वरील ग्रंथांनी ते कार्य साधले.
 'गीतारहस्य' या ग्रंथाने अनेक शतके या देशातील लोकांच्या मनावर निवृत्तीचे जे झापड आले होते ते दूर झाले. शंकराचार्यांच्या गीता, ब्रह्मसूत्रे व उपनिषदे यांवरील भाष्यांनी भारतीय मनावर जवळजवळ हजार वर्षे अधिराज्य चालविले होते. रामानुज, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्क हे संस्कृत आचार्य व