पान:माझे चिंतन.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ५१ 

देशाभिमान ही जी युरोपातली युगतत्त्वे त्यांचे प्रतिपादन करून त्यांना महाराष्ट्रात मन्वंतर घडवून आणावयाचे होते. ते कार्य त्यांनी कसे केले हे आपण पाहिले म्हणजे येथून पुढे जे मन्वंतर आपल्याला घडवून आणावयाचे आहे, त्यासाठी अवश्य जे ग्रंथकर्तृत्व, त्याची स्फूर्ती व सामर्थ्य आपल्या ठायी येईल अशी मला आशा आहे.
 या थोर पुरुषांनी नवी सृष्टी महाराष्ट्रात निर्माण केली असे वर म्हटले आहे. नव्या सृष्टीचा प्रारंभ म्हणजे सामाजिक वा राष्ट्रीय अहंकार- अस्मिता- हा होय. ब्रह्मदेवाची सृष्टीसुद्धा अहंकारापासूनच सुरू होते. तेव्हा मानवी जीवनात त्याच क्रमाने नव्या सृष्टीची उभारणी झाल्यास त्यात नवल काहीच नाही.
 विष्णुशास्त्री यांनी महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रीय अहंकार, म्हणजेच अस्मिता निर्माण केली. इंग्रजांनी आपल्याला रणात पराभूत केले होते आणि आपले साम्राज्य दीर्घकाल चालावे या उद्देशाने भारतीयांचा 'अहं' नष्ट करावा असे त्यांचे प्रयत्न होते. रामायण, महाभारत, गीता हे ग्रंथ उसनवारीने आणलेले आहेत, ते भारतीयांचे नाहीत, वेद-उपनिषदे हे वाङ्मय फार प्राचीन नाही, गणित, ज्योतिष, वैद्यक इ. शास्त्रे प्रथम ग्रीसमध्ये निर्माण झाली व तेथून ती भारतीयांनी घेतली, असे सिद्धान्त सांगून व श्रीकृष्ण, शिवाजी, महाराणा प्रतापसिंह इ. भारतीय थोर पुरुषांची निंदा करून भारतीय जनतेचा तेजोभंग करण्याचा, तिचा आत्मविश्वास नष्ट करण्याचा इंग्रजांनी- इंग्रज पंडितांनी, राज्यकर्त्यांनी, मिशनऱ्यांनी- सतत प्रयत्न चालविला होता. विष्णुशास्त्री यांनी निबंधमालेची रचना करून हे प्रयत्न हाणून पाडले व पूर्वपरंपरेचा अभिमान जागृत करून अहंकाराचा हा दीप जास्तच प्रज्वलित केला. इतिहास, इंग्रजी भाषा, वक्तृत्व, गर्व आमच्या देशाची स्थिती हे त्यांचे निबंध पाहिले म्हणजे मिल, मॉरिस, मेकॉले यांनी भारतीयांच्या इतिहासाची विटंबना करण्याचे जे प्रयत्न चालविले होते ते शास्त्रीबुवांनी विफल करून त्यांचा डाव त्यांच्यावरच कसा उलटविला याची कल्पना येईल. वर सांगितलेच आहे की या थोर पुरुषांना पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा इ. युगे भारतात निर्मावयाची होती. विचारस्वातंत्र्य, समता, बुद्धिवाद ही पुनरुज्जीवनाची प्रधान लक्षणे होत. विष्णुशास्त्री यांच्या प्रत्येक निबंधात या तत्त्वांचे समर्थन केलेले आढळून येईल. 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधात इंग्रजांच्या राज्याचे फायदे काय, ते सांगताना आम्हांला मिळालेले मानसिक स्वातंत्र्य हा फार मोठा