पान:माझे चिंतन.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ५० माझे चिंतन

पित्याचे कार्य करतात. राजकारण, इतिहास, अर्थव्यवहार, समाजशास्त्र हे यांचे विषय आहेत आणि त्यांतील सिद्धान्त अनुभव, प्रयोग, अवलोकन, तर्क यांवर आधारलेले असतात. त्यांचे आवाहन बुद्धीला असते. असे ग्रंथ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कोणत्याच प्रांतात त्या सहासातशे वर्षांच्या काळात झाले नाहीत. आणि त्यामुळेच भारताला तेव्हा पराकाष्ठेची अवदशा प्राप्त झाली होती. अफगाण, तुर्क, मोंगल, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांची या काळात सतत आक्रमणे होत राहिली. आणि त्यातले एकही आक्रमण आपण संपूर्ण परतवू शकलो नाही. भारताच्या व्यापाराची त्या काळात काय दशा होती हे सर्वश्रुतच आहे. कलोपासना, विज्ञानसंशोधन, भूसंशोधन यांची कथा तीच आहे. युरोपात याच काळात शेकडो ग्रंथ निर्माण झाले आणि राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बुद्धिवाद, इहलोकनिष्ठा यांचे तर्कनिष्ठ प्रतिपादन त्यांनी केले. यामुळेच तेथील समाज जागृत झाला, संघटित झाला, बुद्धिवादी झाला आणि त्याने सर्व जगावर राज्य स्थापिले. भारतात तसे ग्रंथ झाले असते तर आपणही पराक्रमाच्या कोटी करून ते वैभव प्राप्त करून घेतले असते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

महाराष्ट्र-नवी सृष्टी

 पण त्यातल्या त्यात सुदैव असे की, पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारानंतर तरी ग्रंथ या शक्तीची उपासना करावी अशी सुबुद्धी आपल्याला झाली आणि त्यामुळेच तेथे सर्व प्रकारची क्रान्ती होऊन आपण ब्रिटिश सत्तेचे निर्दालन करून स्वातंत्र्य मिळविण्यास समर्थ झालो. अभिमानाची गोष्ट अशी की या कार्यास प्रथम महाराष्ट्रात प्रारंभ झाला. त्या वेळी येथे रानडे, तेलंग, भांडारकर, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, राजवाडे, चिंतामणराव वैद्य, तात्यासाहेब केळकर, सावरकर यांसारखे थोर ग्रंथकार निर्माण झाले. एवढ्या सगळ्यांचा विचार येथे करणे अर्थातच शक्य नाही. म्हणून यांतील मूर्धाभिषिक्त जे तीन थोर पुरुष - विष्णुशास्त्री, टिळक व आगरकर— त्यांच्या कार्याचा थोडक्यात विचार करू. या त्रिमूर्तीने आपल्या लेखणीने महाराष्ट्रात नवी सृष्टीच निर्माण केली. तिचे स्वरूप विशद करून या विवेचनाचा समारोप करू. स्वातंत्र्यप्राप्ती, राष्ट्रसंघटना व लोकसत्तेची प्रस्थापना हे या पुरुषांचे ध्येय होते. त्यासाठी पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा, सामाजिक क्रान्ती,