पान:माझे चिंतन.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ४९ 

यांतून सोडविण्यासाठी परमेश्वराने धाडलेले हे दूतच आहेत, अशी जनतेची श्रद्ध होती. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध संपल्यावर तेथील लोकांनी थॉमस पेन याला एक मोठा प्रासाद, शेकडो एकर जमीन इ. देऊन त्याचा गौरव केला यात नवल नाही. पण इंग्लंडमधून निसटूत तो फ्रान्समध्ये गेला तेव्हा त्याच्या स्वागतार्थ हजारो लोक बंदरावर जमा झाले होते. फ्रेंच लोकसभेवर जनतेने त्याची आधीच निवड केली होती. आता त्याचा जयजयकार करून त्याची मिरवणूक काढण्यासाठी लोक जमले होते. जनतेचे हे प्रेम पाहून पेनच्या नेत्रांत अश्रू आले. जनतेला ही भक्ती वाटावी असे व्हाल्टेअर, रूसो, पेन यांच्या जवळ काय होते ? पहिल्या प्रश्नाचे जे उत्तर तेच याही प्रश्नाचे. लेखणी! ग्रंथप्रसवा लेखणी! ग्रंथ, त्यांनी प्रतिपादिलेले समतेचे, स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान आणि त्यासाठी प्राणपणाने झगडण्याची शक्ती!
 ग्रंथसत्ता म्हणजे काय ते सांगून पाश्चात्त्य ग्रंथकारांच्या ग्रंथांच्या आधारे तिचा व्याप काय, महत्त्व केवढे, तिचे सामर्थ्य किती अलौकिक याची काहीशी कल्पना येथवर दिली. आता महाराष्ट्र व मराठी साहित्य यांचा विचार करून हे विवेचन संपवितो.

ललित व तात्त्विक

 मागे एकदा सांगितलेच आहे की मराठीच्या प्रारंभ काळापासून पाश्चात्त्य विद्येचा एकोणिसाव्या शतकात येथे प्रसार होईपर्यंतच्या सहाशे सातशे वर्षांच्या काळात वर सांगितल्या प्रकारचा एकही ग्रंथ महाराष्ट्रात झाला नाही. या विधानाचे थोडे स्पष्टीकरण करतो. मराठीत या काळात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम- महाराजांचे अभंग, मुक्तेश्वर, श्रीधर, मोरोपंत यांची रामायण, महाभारत यांवरील आख्याने (हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, आर्याभारत इ.) हे अतिशय थोर साहित्य निर्माण झाले यात वाद नाही. महाराष्ट्राची, मराठ्यांची मने या साहित्यानेच घडविली आहेत. तेव्हा या साहित्याचा अनादर करावा, उपेक्षा करावी असा मनात मुळीच हेतू नाही. पण मी प्रारंभापासून निबंध- प्रबंध- ग्रंथ हा जो वाङ्मयप्रकार सांगत आहे तो याहून अगदी निराळा आहे आणि या ग्रंथांची उणीव वरील साहित्याने कधीही भरून निघणार नाही. महाभारत, रामायण, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ मातेचे कार्य करतात तर निबंधमाला, केसरी, सुधारक यांतील निबंध-हे ग्रंथराज (दासबोधाप्रमाणे हे ग्रंथराजच आहेत)- हे