पान:माझे चिंतन.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४८ माझे चिंतन

करण्यासाठी त्याने आपल्या लेखणीचे सर्व सामर्थ्य पणाला लावण्याचे ठरविले होते. पण विधिसंकेत निराळा होता.
 अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवस थॉमस पेन इंग्लंडमध्ये होता. तेथून परत जाऊन निराळ्या कार्यात मन गुंतवावे असा विचार त्याच्या मनात घोळत होता. एवढ्यात फ्रान्समध्ये क्रांतीचे शिंग फुंकले गेल्याची व बॅस्टिल पडल्याची बातमी आली. त्यामुळे पेनचे सर्व भवितव्य बदलले. ही क्रांती म्हणजे स्वातंत्र्य, समता, मानवता यांच्या संग्रामातील पुढची पायरी आहे असे इंग्लंडने मानावे व फ्रेंच लोकांचा पक्ष घेऊन या तत्त्वाच्या प्राणप्रतिष्ठेच्या महान कार्यात भाग घ्यावा असे तो प्रतिपादू लागला व पुस्तके, पत्रके यांचा इंग्लिश राजसत्तेवर भडिमार करू लागला. याच काळात त्याने आपला 'राइटस ऑफ मॅन' हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या चरित्रकाराने लिहिले आहे की, या ग्रंथाने युरोप व अमेरिका या दोन्ही खंडांना हादरा बसला. म्हणून विचारी लोक त्याला बुद्धिवादाचे बायबल (न्यू टेस्टामेंट) अशी पदवी देतात. इंग्लंडमधल्या पुरोगामी लोकांनी या ग्रंथाचे सहर्ष स्वागत केले. पण राजपक्षीय सत्ताधाऱ्यांना हा ग्रंथ पचविणे शक्य नव्हते. त्यांनी पेनवर खटला भरला व त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पेन आधीच फ्रान्समध्ये निसटून गेला होता.
 ग्रंथसत्तेचे सामर्थ्य काय आहे हे पाहावयाचे असल्यास रूसो, व्हाल्टेअर, थॉमस पेन यांच्या ग्रंथांचे, एका बाजूने राजसत्ता व दुसऱ्या बाजूने जनता, यांनी कसे स्वागत केले हे ध्यानात घ्यावे. राजसत्तेच्या प्रकोपामुळे या तिघांनाही स्वदेश सोडून हद्दपार व्हावे लागले होते. आणि ते परत येऊन आपल्या सत्तेला सुरूंग लावतील या भीतीने इंग्लंड-फ्रान्समधल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर फाशीचे चक्र फिरते ठेवले होते. बलशाली सेना, जय्यत रणसामग्री, अनियंत्रित सत्ता व परंपरागत राजसिंहासन एवढे सामर्थ्य पाठीशी असताना राजसत्तेने या पुरुषांना भ्यावे असे त्यांच्याजवळ काय होते ? लेखणी! बहुग्रंथप्रसवा अशी लेखणी! या लेखणीला जे पुत्र होतील ते आपला घात करतील अशी सर्व राजांना बालंबाल खात्री होती. म्हणून देवकीच्या पुत्रांचा जन्मतःच नाश करण्याचा कंसाने जसा निश्चय केला होता तसाच या लेखणीच्या पुत्रांचाही संहार करण्याचा इंग्लंड व फ्रान्सच्या राजांनी निश्चय केला होता. उलट जनतेला रूसो, व्हाल्टेअर, पेन हे अवतारी पुरुष वाटत होते. अन्याय, जुलूम, यातना, दारिद्र्य, पिळवणूक, शोषण