पान:माझे चिंतन.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ४७ 

पद्धतीचा गौरव करून त्याने अप्रत्यक्षपणे फ्रेंच राजसत्तेवर प्रखर टीका केली होती. फ्रेंच शासनाला त्याचा डायनामाइटसारखा हादरा बसला. यामुळे सरकारने त्याची जाहीर होळी करून व्हाल्टेअरला पकडण्याचा हुकूम सोडला.
 व्हॉल्टेअर प्रारंभी काव्यनाटकांतून आपले क्रांतीचे विचार मांडीत असे. पुढे ते आवरण त्याने फेकून दिले व लोकसत्ता, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद या विषयांवरील पुस्तिका, पत्रके यांचा त्याने अगदी वर्षाव करण्यास प्रारंभ केला. 'राजवाड्यातील संगीताच्या तालावर सामान्य जनता मृत्यूकडे चालली आहे.' 'जनतेला तुम्ही पशूसारखे वागविले तर आज ना उद्या ती तुमच्या पोटात आपली शिंगे भोसकून तुम्हाला ठार केल्यावाचून राहणार नाही,' ही त्याची वाक्ये अनेक वर्षे लोकांच्या जिव्हाग्रावर नाचत होती. यावरून जनतेवर सत्ता लुई राजांची होती की या थोर तत्त्ववेत्त्यांची होती हे सहज उमजून येईल.

अमेरिकन राज्यक्रांती

 काही इतिहासकारांच्या मते रूसो- व्हाल्टेअर यांच्या ग्रंथांचा प्रभाव अमेरिकेवरही पडला होता, आणि अमेरिकन क्रांतीच्या मागे हीच प्रेरणा होती. या विधानात सत्यांश आहे. पण तो थोडा आहे. यांच्या ग्रंथांनी अमेरिकेला प्रेरणा दिली असली तर ती अप्रत्यक्षपणे. तेथे प्रत्यक्ष क्रांतीची चेतावणी देणारा थोर ग्रंथकार म्हणजे थॉमस पेन हा होय. 'राईटस ऑफ मॅन' व 'एज ऑफ रीझन' हे त्याचे महनीय ग्रंथ होत. इंग्लंडचा जुलूम अमेरिकन जनतेला असह्य होऊ लागला तेव्हा थॉमस पेन याने लेखणी उचलली आणि अत्यंत प्रक्षोभक अशा पुस्तिका तो भराभर समाजावर वर्षू लागला. 'अमेरिकन स्वातंत्र्याचे ध्येय हे अखिल मानवतेचे ध्येय असून त्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तोच आम्हांला इंग्लिश शृंखलांतून मुक्त करील,' असे उदात्त विचार तो मांडू लागला. त्याची शैली इतकी भेदक व भाषा इतकी जहरी होती की त्याच्या पत्रकांनी अमेरिकन बहुजनांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि इंग्लंडफ्रान्समध्येही विचारवंत लोक अमेरिकन स्वातंत्र्याला अनुकूल झाले. समता, व्यक्तिस्वातंत्र्य, मानवत्वाची प्रतिष्ठा, लोकसत्ता या तत्त्वांचा पेन हा कट्टा पुरस्कर्ता होता. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, हॉलंड या देशांत या तत्त्वांची प्राणप्रतिष्ठा झाली तर पुढे मागे या सर्वांचे मिळून एक संघराज्य होईल, असे स्वप्न त्याला पडत असे. हे स्वप्न साकार