पान:माझे चिंतन.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४६ माझे चिंतन

अशा सर्व क्षेत्रांतले अनेक घटक क्रान्तीला किंवा उत्पाताला कारण होत असतात. पराकाष्ठेची विषमता, भयानक जुलूम, घृणास्पद अन्याय, आत्यंतिक दारिद्र्य, यांमुळेच समाजात उत्पात होतात. पण ती विषमता, तो जुलूम, तो न्याय हे सर्व समाजाने स्वीकारलेल्या धार्मिक, सामाजिक वा राजकीय संस्थांमुळे, तत्त्वांमुळे होत असते. आणि ती तत्त्वे उलथून टाकल्यावाचून उत्पातांना, बंडाळ्यांना क्रांतीचे प्रतिष्ठित रूप येत नाही, व त्या उत्पानांतून नवा माणूस व नवा समाज निर्माण होत नाही. ग्रंथाचा संबंध येथे येतो. राजसत्ता जाऊन लोकसत्ता यावयाची तर राजसत्ता ही समाजाला घातक आहे व लोकसत्ता पोषक आहे हा विचार जनतेला पटला पाहिजे आणि मान्य झाला पाहिजे. आणि कोणताही विचार मान्य व्हावयाचा म्हणजे निबंध-ग्रंथ या वाङ्मयाची निर्मिती होणे अवश्य असते. कोणतीही क्रान्ती, कोणतेही नवयुग ग्रंथावाचून होत नाही याचे कारण हे असे आहे.

फ्रेंच राज्यक्रान्ती

 वर उल्लेखिलेल्या फ्रेंच राज्यक्रान्तीचेच उदाहरण पाहा. फ्रान्समध्ये बोरबॉन राजांची अनियंत्रित सत्ता दीर्घकाळ चालू होती. या काळात विषमता, अन्याय, जुलूम, पिळवणूक, छळ यांनी अगदी कहर केला होता. सामान्यजनांना किडा-मुंगी, जंतू यांपेक्षा जास्त महत्त्व नव्हते. मग व्यक्तित्व कोठून असणार ? अशा स्थितीत रूसो, व्हाल्टेअर, माँटेस्क यांनी समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचे तत्त्वज्ञान आपल्या ग्रंथांतून फ्रेंच जनतेत प्रसृत केले आणि त्यामुळेच क्रांतीचा वणवा भडकून त्यांत राजसत्तेची आहुती पडली. 'सामाजिक करारनामा' हा समाजरचनेचा पाया आहे, या करारनाम्यान्वये लोक हे अधिराज असतात, त्यांनी आपली सत्ता शास्त्यांना कांही अटींवर दिलेली असते, त्या अटी त्यांनी मोडल्या तर लोकांना बंड करण्याचा हक्क असतो इ. सिद्धान्त रूसोने आपल्या 'सोशल काँट्रॅक्ट' या ग्रंथांत सांगितले आहेत. या ग्रंथाचा प्रभाव एवढा होता की डांटन, मिराबू इ. फ्रेंच क्रांतीचे पहिले नेते रूसोचा हा ग्रंथ नित्य खिशात ठेवीत असत आणि कसली शंका उद्भवली तर त्याचा आधार घेऊन निर्णय करीत. व्हाल्टेअरचे ग्रंथ असेच प्रभावी होते. प्रारंभी तो काव्य, नाटक या रूपाने लिहीत असे. पण त्यांचा विषय समता, व्यक्तिस्वातंत्र्य, धर्म सहिष्णुता हाच असे. इंग्लंडला जाऊन परत आल्यावर त्याने 'लेटर्स ऑन इंग्लिश' हे पुस्तक लिहिले. त्यात इंग्लिश राज्य-