पान:माझे चिंतन.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ४५ 

तेव्हापासून साधारण १८५० पर्यंत म्हणजे पाश्चात्त्य विद्येचा प्रसार होईपर्यंत महाराष्ट्रात वर वर्णिलेल्या प्रकारचा ग्रंथ कोणत्याच क्षेत्रात निर्माण झाला नाही. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी यांनी प्रथम या प्रकारची काहीशी रचना केली, आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ग्रंथरचनेला महाराष्ट्रात खरा प्रारंभ केला. त्यानंतरच्या पाऊणशेऐंशी वर्षांच्या काळात टिळक, आगरकर, राजवाडे, वैद्य, केळकर, सावरकर, माटे, जावडेकर, वा. म. जोशी यांसारखे थोर निबंधकार महाराष्ट्रात झाले. गीतारहस्य, संस्कृतिसंगम, सत्तावनचे स्वातंत्र्ययुद्ध, आधुनिक भारत यांसारखे प्रभावी ग्रंथही मराठीत झाले; पण आपल्याला नवमहाराष्ट्राची निर्मिती करावयाची आहे. येथल्या जनतेत लोकशाहीची तत्त्वे रुजवावयाची आहेत. जन्मनिष्ठ उच्चनीचता, जातिभेद, अस्पृश्यता ही नाहीशी करून समतेच्या तत्त्वावर समाजाची नवी घडण करावयाची आहे. शेकडो वर्षे आर्थिक दृष्टीने अप्रगत राहिलेल्या महाराष्ट्राला नवा अर्थव्यवहार शिकवावयाचा आहे. येथल्या बहुजनसमाजात विज्ञाननिष्ठा दृढमूल करून त्याचे मन कणखर करावयाचे आहे. एवंच, भारतात व महाराष्ट्रात नवा माणूस निर्माण करावयाचा आहे. त्या दृष्टीने पाहाता आवश्यक ती निबंध- ग्रंथरचना महाराष्ट्रात मुळीच होत नाही. राष्ट्रीय जीवनाला अत्यंत आवश्यक असे हे पौष्टिक महाराष्ट्राला जवळ जवळ मिळतच नाही. इतकेच नव्हे तर याचे महत्त्वही नीट ध्यानात आलेले नाही. म्हणून या विषयाचा सविस्तर प्रपंच करावा असा विचार केला आहे.

क्रान्तिप्रेरणा

 आर्थिक क्षेत्रात ग्रंथसत्ता कशी प्रभावी असते याचा थोडासा विचार आपण वर केला. जगातील मोठमोठ्या क्रान्त्यांचा इतिहास आपण पाहिला, तर प्रत्येक क्रान्तीच्या मागे एक किंवा अनेक प्रभावी असे ग्रंथ होते असे आपल्या ध्यानात येईल. रूसोचा 'सोशल काँट्रॅक्ट' हा ग्रंथ फ्रेंच राज्यक्रांतीला किती प्रेरक झाला इतिहासज्ञांस सांगावयास नकोच. रूसो, व्हाल्टेअर, डिडेरो व माँटेस्क यांनाच कोणी कोणी फ्रेंच राज्यक्रान्तीचे जनक मानतात आणि ते फार मोठ्या अर्थाने खरे आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. असे म्हणताना कोणतेही एकांतिक विधान मला करावयाचे नाही. कोणतीही क्रान्ती होते, कोणतेही नवयुग निर्माण होते, त्याच्या मागे अनेक प्रेरणा असतात. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय