पान:माझे चिंतन.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४४ माझे चिंतन

तुमचेच आहे, आणि भांडवलदार, कारखानदार हेच लुटारू आहेत, असे त्यांना सांगितले. कॅपिटलमध्ये प्रतिपादिलेल्या या विचाराने लोकमनाची पकड घेताच त्यातून एवढा प्रचंड वडवानल निर्माण झाला की त्यात साम्राज्येच्या साम्राज्ये जळून खाक झाली. आणि आजही अमेरिका, जर्मनी, ब्रिटन यांसारख्या बलाढ्य देशांना कम्युनिझम ही एक कायमची दहशत होऊन बसली आहे. ही सर्व समुद्रवलयांकित पृथ्वी कॅपिटल या ग्रंथाने अशी हादरून टाकली आहे.
 ग्रंथाची महती सांगताना आर्थिक क्षेत्रातील दोन ग्रंथांचा आपण विचार केला. या क्षेत्रातील इतरही अनेक ग्रंथांचा असाच निर्देश करता येईल. जर्मनीचा सध्याचा अर्थमंत्री लुडविग एरहार्ड याचा 'प्रोग्रेस थ्रू कॉंंपिटिशन' अमेरिकन अर्थमंडित हायेक याचा 'रोड टू सर्फडम्,' युगोस्लाव्हियाच्या क्रांतीचा नेता जिलास याचा 'न्यू क्लास' इ. अनेक ग्रंथांनी आपापल्या परीने समाजमनाला वळण लावण्याचे कार्य केलेले आहे. पण प्रारंभी वर्णिलेल्या दोन ग्रंथांवरून माझ्या मनातील अभिप्रेत अर्थ चांगला व्यक्त होत असल्यामुळे आता आणखी विस्तार करीत नाही.
 वाचकांपुढे महाराष्ट्रात काहीशा उपेक्षिल्या गेलेल्या साहित्याच्या शाखेविषयीचा मनातला विचार मांडावा या हेतूने आजच्या विषयाची निवड मी केली आहे. निबंध, प्रबंध किंवा ग्रंथ या नावांनी जिचा निर्देश होतो ती ही शाखा होय. काव्य, कादंबरी, नाटक, लघुकथा याहून ही सर्वस्वी निराळी आहे. ते वाङ्मय प्रकार भावनांना आवाहन करतात तर ग्रंथ हा बुद्धीला आवाहन करतो. त्यामुळे त्याची रचना अगदी भिन्न होते. इतिहास, अनुभव, प्रयोग, अवलोकन यांतून निघालेले सिद्धान्त यात प्रतिपादन केलेले असतात, आणि ते तर्कनिष्ठ पद्धतीने मांडलेले असतात. आधार, प्रमाण, खंडनमंडन, तुलना, अन्वय, व्यतिरेक यांना ग्रंथात महत्त्व असते. आणि या पद्धतीनेच त्याला सामर्थ्य प्राप्त झालेले असते. समाजाच्या प्रगतीला, उत्कर्षाला अत्यंत अवश्य असा हा जो ग्रंथ त्याची भारतात अत्यंत उपेक्षा झालेली आहे. ब्रिटिश येथे येण्यापूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारतात ग्रंथ असा निर्माणच झाला नाही. याविषयी सविस्तर विवेचन 'निबंधरचना व राष्ट्ररचना' या माझ्या लेखात मागे मी केले आहे. तेवढा सर्व विषय आज येथे मांडून होणार नाही. आज येथे महाराष्ट्रापुरताच विचार करावयाचा आहे.
 मुकुंदराज, ज्ञानेश्वर यांच्या काळापासून मराठी साहित्याला प्रारंभ झाला. पण