पान:माझे चिंतन.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ४३ 

कॅपिटलचे पठण होत नाही. १८६७ साली या ग्रंथाचा जन्म झाला. १८८० पासून त्यातील तत्त्वज्ञान आगीसारखे जगात पसरत चालले, आणि पुढील दशकात कार्ल मार्क्स हा जगाचा राजाधिराज झाला. रशिया आणि चीन या देशांत त्याच्या ग्रंथामुळे केवढ्या प्रचंड उलथापालथी झाल्या, प्रलयकंप झाले हे आपल्यापैकी अनेकांनी स्वतःच्या हयातीतच पाहिले आहे. या दोन देशांतील मिळून पंचाऐशी कोटी जनता कॅपिटल या ग्रंथाच्या प्रत्यक्ष साम्राज्याखालीच आहे. पोलंड, पूर्व जर्मनी, रुमानिया, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया यासारखे पूर्व युरोपातील देशही बव्हंशी तसेच आहेत. आणि अप्रत्यक्षपणे त्याची सत्ता किती लोकांच्या मनावर चालते हे पाहण्यास दूरदेशी जाण्याचे कारण नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष जरी सत्ताधारी नाही तरी आपल्या सत्ताधाऱ्यांमध्ये कम्युनिस्ट वा तत्सम अनेक लोक आहेत आणि आपल्या पंचवार्षिक योजना व आपले परराष्ट्रीय राजकारण ह्यावर त्यांचा अतिशय प्रभाव आहे, हे सर्वांना माहीतच आहे.
 ग्रंथसत्ता म्हणजे काय, ग्रंथाचे सामर्थ्य काय असते, एक ग्रंथ जगावर केवढे साम्राज्य स्थापू शकतो, राजाधिराज, महाराज, सम्राट, चकवर्ती यांच्यापेक्षाही त्याची सत्ता कशी प्रभावी असते हे पाहावयाचे असल्यास कॅपिटल या ग्रंथाचा व त्यांतील तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचा इतिहास आपण बारकाईने अभ्यासावा. आज कम्युनिझमला ओहोटी लागली आहे पण विसाव्या शतकाची पहिली तीसपस्तीस वर्षे पाहिली तर असे दिसून येईल की त्या काळात धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, मातृभक्ती, पितृभक्ती, पातिव्रत्य इ. हजारो वर्षे दृढमूल झालेली जी तत्त्वे त्यांना मार्क्सवादाने सुरूंग लावून उद्ध्वस्त करून टाकण्याची वेळ आणली होती. आणि आजही लाखो लोकांच्या मनात या तत्त्वांविषयीचा द्वेष घर करून राहिलेला आहे. मार्क्सनेच स्वतः म्हटले आहे की जेव्हा एखादा विचार जनमनाची पकड घेतो तेव्हा त्याच्या ठायी प्रचंड शक्ती निर्माण होते. श्रममूल्यसिद्धान्त, वर्गविग्रह, ऐतिहासिक जडवाद व विरोधविकासवाद या मार्क्सच्या सिद्धान्तांना पन्नास एक वर्षे तरी असेच सामर्थ्य प्राप्त झाले होते. मार्क्सपूर्वी कामगार ढोरासारखे करीत होते, तरी भाकरीच्या तुकड्यालाही ते महाग होते. पण हा अन्याय, हा जुलम व त्यामुळे होणाऱ्या यमयातना ते निमूटपणे सहन करीत होते. कारण आपण निर्माण केलेल्या धनावर आपला हक्क आहे, हे त्यांच्या स्वप्नातही आले नव्हते. श्रममूल्यसिद्धान्त सांगून मार्क्सने, तुमच्या श्रमांतून निर्माण झालेले धन