पान:माझे चिंतन.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ४२ माझे चिंतन

तत्वज्ञान होते. आणि हे तत्त्वज्ञान ॲडम स्मिथने सांगितले होते. अनिर्बंध अर्थव्यवहार, सर्वस्वी अनियंत्रित अर्थव्यवस्था हीच सर्वांच्या हिताला पोषक आहे, असा स्मिथचा सिद्धान्त होता. त्याच्यावर शास्त्यांची, नेत्यांची व अर्थकोविदांची पूर्ण श्रद्धा होती. या काळात कामगारांचे जीवन म्हणजे नरक होता, त्यांना अगदी यमयातना भोगाव्या लागत असत. समाजाच्या नेत्यांना, अर्थवेत्त्यांना त्यांच्याविषयी सहानुभूती नव्हती, दया नव्हती असे नाही. पण अर्थव्यवहाराचे नियम हे निसर्गनियमाप्रमाणे मानवी सामर्थ्याच्या बाहेरचे आहेत, तेथे कोणी काही उपाय करू शकणार नाही, असा 'वेल्थ ऑफ नेशन्स' या ग्रंथाचा सिद्धान्त होता. आणि शास्त्यांच्या मनावर त्याची सत्ता असल्यामुळे ते समाजातील भयानक विषमतेचे समर्थनच करीत होते. त्यावेळचा समाज पराकाष्ठेचा व्यक्तिवादी झाला होता. मनुष्याला दारिद्र्य आले, दुःख भोगावे लागले, विपरीत भवितव्य त्याच्या कपाळी आले तर याला त्याचा तोच जबाबदार आहे, परिस्थितीशी त्याचा काही संबंध नाही, असा अत्यंत अशास्त्रीय व घातक सिद्धान्त स्मिथने सांगितला होत. काही पंडितांच्या मते त्याचा तसा अर्थ लोकांनी बसविला होता. काही असले तरी बहुसंख्य अर्थवेत्ते व नेते यांच्या मनावर स्मिथच्या ग्रंथाचा प्रभाव होता आणि त्यामुळे 'ज्याचा तो' हा आत्यंतिक व्यक्तिवादी सिद्धान्त त्यांनी स्वीकारला होता. त्यामुळे व्यक्तीला रूढ अर्थव्यवस्थेमुळे कितीही दैन्य प्राप्त झाले तरी सरकारने कायदे करून त्या व्यवस्थेत हस्तक्षेप करावयाचा नाही, तिचे नियंत्रण करावयाचे नाही, असे धोरण त्यांनी अवलंबिले होते. जवळजवळ शंभरसवाशे वर्षे 'वेल्थ ऑफ नेशन्स' या ग्रंथाचे राज्य जगावर चालू होते. त्यामुळे मानवाचे प्रत्येक देशात फार हाल झाले. अनेक देशांत त्यामुळे अराजक माजले व क्रांत्या होण्याची वेळ आली. शेवटी यामुळे जोरदार प्रतिक्रिया सुरू होऊन हळूहळू या ग्रंथाच्या सत्तेला शह बसला.
 'वेल्थ ऑफ नेशन्स' या ग्रंथाला पदच्युत करून त्याची सत्ता नष्ट करण्याचे कार्य ज्या ग्रंथाने केले त्याचे नाव माहीत नाही असा सुशिक्षित माणूस आजच्या जगात सापडणे जवळजवळ अशक्यच आहे. बायबलाच्या खालोखाल, कदाचित बायबलइतकीच, जगात जनमानसावर जर एखाद्या ग्रंथाने दृढ पकड बसवली असेल तर ती कार्ल मार्क्सच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथाने. आज जगात असा एकही देश नाही की जेथे कम्युनिस्ट पंथाचे अनुयायी नाहीत आणि जेथे दास