पान:माझे चिंतन.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथसत्ता ४१ 

राजांना तत्त्वज्ञान कोठले असणार असा प्रश्न मनात येईल. पण हे राजे मूढ व म्हणूनच मदांध, उन्मत्त असे असले तरी त्या मदांधतेचे, अनियंत्रिततेचे, अरेरावीचेच त्यांनी किंवा त्यांच्या सरदारांनी, सेनापतींनी वा मंत्र्यांनी एक तत्त्वज्ञान बनविलेले असे. राजा ईश्वरी अंश आहे, त्याची सत्ता ईश्वरदत्त असते, तो प्रजेला कधीही उत्तरदायी नसतो, धर्मक्षेत्रातही अंतिम सत्ता राजाचीच असते, हे व अशा प्रकारचे सिद्धान्त मागल्या इतिहासात किती रूढ होते हे सर्वविश्रुत आहे. म्हणजे मागल्या काळातही शासनावर व शास्त्यांवर अधिराज्य असे ते कोठल्या ना कोठल्या विचारप्रणालीचे म्हणजेच ग्रंथाचे असे. अर्वाचीन काळाबद्दल तर बोलावयासच नको. सुसंस्कृत जगाच्या इतिहासात असा एक कालखंड वा भूखंड सापडणार नाही की ज्या वेळी ग्रंथांचे राज्य समाजावर नव्हते, असा यावरून आपण सिद्धान्त केला तर त्यात अतिशयोक्ती होईल असे वाटत नाही. सर्व अशी ही जी ग्रंथसत्ता तिचे स्वरूप आता स्पष्ट करू.

आर्थिक जीवन

 आजचे आपले जीवन अर्थप्रधान झाले आहे. अर्थमूलोहि धर्मः । असे मागल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या काळातही कौटिल्याने सांगितले होते. आज तर ते वचन सर्व दृष्टींनी सार्थ ठरू पाहात आहे. भांडवलशाही, समाजवाद, कम्युनिझम या समाजरचनांमध्ये अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांनाच महत्त्वाचे स्थान असते. म्हणून जीवनाला व्यापून दशांगुळे उरलेल्या या आर्थिक तत्त्वांपासूनच आपण विचाराला प्रारंभ करू.
 'वेल्थ ऑफ नेशन्स' हा ॲडम स्मिथचा ग्रंथ १७७६ साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथाने पाश्चात्त्य जगावर व पाश्चात्त्यांच्या वर्चस्वाखाली आलेल्या पौर्वात्य जगावरही पुढील शंभर वर्षे अगदी अबाधित, निरंकुश, अनियंत्रित असे राज्य चालविले होते. याच सुमारास प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर पश्चिम युरोपात औद्योगिक क्रांती झाली. तिच्यामुळे अमाप धन देशात आले, पण त्याची वाटणी अत्यंत विषम झाल्यामुळे भांडवलदार व कामगार असे दोन वर्ग निर्माण होऊन त्यांच्या आर्थिक स्थितीतील आत्यंतिक विषमतेमुळे फार मोठ्या अनर्थ- परंपरा निर्माण झाल्या. या अनर्थ- परंपरा दिसत असूनही त्या त्या देशांतील शासनाने अर्थव्यवहारात हस्तक्षेप का केला नाही ? त्याचे कारण असे की हस्तक्षेप करू नये असेच त्यांचे