पान:माझे चिंतन.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






ग्रंथसत्ता






 ग्रंथसत्ता हा शब्द कानाला जरा विचित्र लागेल. राजसत्ता, दण्डसत्ता, लोकसत्ता हे शब्द आपल्या परिचयाचे आहेत, तसा ग्रंथसत्ता हा नाही. हा शब्द परिचयाचा नसला तरी त्याची विवक्षा, त्यातील अभिप्रेत अर्थ मात्र आपल्या परिचयाचा आहे आणि तोच अर्थ आजच्या लेखात विशद करावयाचा आहे. राजसत्ता, दण्डसत्ता, लोकसत्ता या शासनप्रकारांत भिन्नभिन्न प्रकारची सत्ता असते. कोठे राजा राज्य करतो, कोठे कोणी हुकूमशहा सत्ता चालवितो तर कोठे लोकसभेचे शासन चालते. पण आपण सूक्ष्म विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की या सर्व शासनव्यवस्थांत समाजावर ग्रंथाचीच सत्ता चालू असते. कशी ते पाहा. कोणताही शासनप्रकार घेतला तरी त्यात सत्ता मनुष्याचीच असते. कोठे एक मानव असतो. कोठे मानवसंघ राज्य करतो. आणि कोणताही मानव घेतला तरी तो काही श्रद्धा, काही विचार, काही तत्त्वज्ञान यांनी प्रेरित झालेला असतो. त्या धोरणानेच तो राज्य करीत असतो. रामचंद्र, हरिश्चंद्र, युधिष्ठिर हे राजे असोत, मुसोलिनी, हिटलर, स्टॅलिन हे दंडधर असोत, वॉशिंग्टन, चर्चिल, नेहरू हे लोकवादी शास्ते असोत, ते कोणत्या ना कोणत्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी असतात. त्या तत्त्वज्ञानाच्या चिंतनाने त्यांनी आपल्या मनाशी काही सिद्धान्त निश्चित केलेले असतात. आणि त्या अन्वयेच शासन चालवावयाचे असा त्यांचा कृतनिश्चय असतो. त्यामुळे या नेत्यांचे शासन म्हणजे त्यांनी स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानाचे म्हणजे ते तत्त्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या, समाजात ते दृढमूल करणाऱ्या, ते सिद्ध करणाऱ्या ग्रंथांचे शासन असते, हे सहज दिसून येईल. मागल्या काळात अनेक वेळा, अनेक देशांत राजे हे अगदी जडमूढ, अक्कलशून्य असे असत. अशा