पान:माझे चिंतन.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३८ माझे चिंतन

पंडित जवाहरलालजींनी आणखी पुढे जाऊन सांगितले आहे, की केंद्र व प्रांत यांच्यांत आणि प्रांताप्रांतांत सहकार्य व एकवाक्यता नाही एवढेच नव्हे तर एका प्रांताच्या भिन्न खात्यातही सहकार्य दिसत नाही ! येथे एक गोष्ट मुद्दाम निदर्शनास आणावयाची आहे ती ही, की आळस, अनभ्यास, अज्ञान, नालायकी, कर्तृत्व- शून्यता इत्यादी दुर्गुण वरील अपयशास कारण झालेले आहेतच; पण एवढ्या प्रचंड योजनेत प्रत्येक प्रांतात कार्यनिपुण, दक्ष, तंत्रविशारद असे कार्यकर्तेही होते व आहेत. पण सांघिक जीवनाच्या गुणांची कमतरता त्यांच्या ठायीही असल्यामुळे आपल्या बहुतेक योजना कोसळून पडत आहेत !
 'क्रिकेट हे आपल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे' असे मी म्हटले ते या अर्थाने. वैयक्तिक गुणांच्या दृष्टीने कार्यनिपुण, क्रीडा कुशल असलेले विख्यात असे खेळाडू एकत्र येऊनही आपल्याला अपयश येते ! कारण अकरा लोकांची शक्ती एकाच्या अकरा पट करण्याची विद्या आपल्याजवळ नाही ! आपण एकमेकांच्या सान्निध्यात आलो की अपूर्णकांचा गुणाकार तयार होतो.

आणि हे कशाचे निदर्शक ?

 या ठिकाणी एक गमतीचा विचार मनात येतो. अलंकारिक अर्थापुरता का होईना पण तो खरा आहे असे वाटते. आपल्या हॉकीच्या खेळाकडे दृष्टी टाकून पाहा. या खेळाच्या संघाने गेल्या पंचवीस वर्षांत सारखे विजय मिळविले आहेत. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादी सर्व देशांत तो अजिंक्य ठरला आहे. तेव्हा सांघिक जीवन कसे असावे याचा 'भारतीय हॉकी संघ' हा उत्कृष्ट आदर्श आहे. पण या हॉकीच्या खेळाची व त्या संघाची भारतीय लोक कितपत दखल घेतात ? क्रिकेटच्या तुलनेने कितपत घेतात ? शाळा-कॉलेजात त्याची उपेक्षाच असते. क्रिकेटसारखे त्याचे मोठे सामनेही होत नाहीत. कारण, समाजाला त्याची गोडी नाही आणि सरकारलाही त्याचे फारसे सोयरसुतक नाही. परवा हेलेसिंकीला विजय मिळविणाऱ्या संघाजवळ मायदेशी परत येण्यापुरता पैसा नव्हता! प्रत्येक देशात सामने करून त्यावर पैसा मिळवून त्यांना परत यावे लागले.
 हा केवळ योगायोग असेल, आपण मुद्दाम, हेतुपूर्वक असे केले असे मी म्हणत नाही. पण हा योगायोग कशाचा निदर्शक आहे ? व्यक्तिगत प्राविण्याने संपन्न असूनही संघविद्या नसल्यामुळे ज्या क्रिकेटमध्ये जगाच्या आखाड्यात आपल्याला