पान:माझे चिंतन.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी ३५ 

नाही. स्वार्थ, लोभ, दुष्टपणा, मत्सर यांमुळे माणूस स्वकेंद्रित होतो ते निराळे; त्यामुळे समाजाची हानी होतच असते. पण आम्ही वरच्या पायरीवर गेलो, निर्लोभ झालो तरी आमची दृष्टी अशी स्वकेंद्रित असते. आणि त्यामुळे वैयक्तिक सद्गुणांची संपादणी उत्तम करूनही श्रेष्ठ समाजधर्म व ते सद्गुण यांचा समन्वय घालण्याची दृष्टी नसल्यामुळे आमच्या सद्गुणांतूनही विपरीत अनर्थ निर्माण होतात. मी सांगत आहे ती आपल्या सद्गुणांची कहाणी आहे ! दुर्गुणांमुळे समाज विघटित होणे हे नेहमीचेच आहे; पण आपण सद्गुण म्हणून ज्यांची जोपासना करतो त्यांतूनच आपल्या समाजविमुख, आत्मकेंद्रित दृष्टीमुळे अशी चमत्कारिक मूल्ये निर्माण होतात, की त्यांचा परिणाम विघातक व्हावा !
 आपल्या समाजातील कित्येक जमातींनी भूतदयेमुळे मांसाहार वर्ज्य केला. आता भूतदया हा केवढा सद्गुण आहे ! पण आपला हा धर्म अखिल समाजधर्माशी मिळून कसा बनेल याचा विचार स्वप्नातही, आमच्या मनाला शिवत नसल्यामुळे त्यातून काय निर्माण झाले पाहा ! मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोक स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. त्यांचा प्रथम निराळा गट व नंतर स्वतंत्र जाती झाली, इतरांना ते लोक तुच्छ लेखू लागले व दूर ठेवू लागले; आणि त्यामुळे जातिमत्सर वाढून त्यांची भूतदया विघटनेस मात्र कारण झाली ! प्राण्यांची हत्या होऊ नये या शुभ व्रतांतून इतके तीव्र जातिद्वेष निर्माण झाले, की त्यामुळे मनुष्यहत्या होऊ लागली. याचे कारण एकच; स्वतःच्या भूतदयेच्या सामाजिक मूल्यांचा आपण विचार करीत नाही. वैयक्तिक व सामाजिक धर्माचा समन्वय घालण्याची दक्षता आम्ही बाळगीत नाही.

आमच्या स्वच्छतेच्या शास्त्रात

 आमचे स्वच्छतेचे शास्त्र पाहा. आम्ही भारतीय स्वच्छतेचे भोक्ते आहो यात शंका नाही. आपल्या घरात आपण स्वच्छता ठेवतो ती वाखाणण्याजोगी असते. खेड्यांतसुद्धा जमिनी स्वच्छ सारवलेल्या, भांडी लख्ख घासलेली, झाडलोट आस्थेने केलेली असे घराचे स्वरूप आपल्याला दिसते; पण ते घरात ! उंबरठ्याबाहेर बघा. घरातली सर्व घाण तेथे चार फुटांवर टाकलेली असते. ती कुजत असते, तेथे दुर्गंधी येत असते; पण तो विचार घरातल्या माणसांच्या स्वच्छतेच्या शास्त्रात येत नाही. कारण ती जागा सार्वजनिक आहे. आणि सार्वजनिक जीवनात