पान:माझे चिंतन.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३४ माझे चिंतन

भाऊसाहेबांनी तोच विवेक संभळून, त्या वेळी माघार घेऊन, वर्ष दोन वर्षे जरूर तर थांबून पुन्हा चढाई केली असती तर महाराष्ट्राची एक पिढी गारद होण्याऐवजी त्याचे आसन त्या वेळीच दिल्लीला स्थिर झाले असते. पण भाऊसाहेबांच्या त्या मनोवृत्तीमुळे हे साधले नाही.
 पण ही वृत्ती हीच भारताची प्रकृती आहे ! शिवछत्रपती हे अपवाद आहेत.

जीविताची घडणच तशी !

 आपण एका राष्ट्राचे, समाजाचे, एका समूहाचे एक घटक या दृष्टीने स्वतःकडे पाहावे हा संस्कार आमच्या मनावर नाही. या दृष्टीने आम्ही स्वतःकडे पाहात नाही. एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती अशा दृष्टीने आपण स्वतःचा विचार करतो. आपली स्वतःची उन्नती, परिणती, पूर्णता, मोक्ष ही गोष्ट सर्वस्वी समाजनिरपेक्ष आहे, अशी आमची बाल्यापासून वार्धक्यापर्यंत भावना असते व तद्नुसार आपले वर्तन असते; मराठ्यांनी कुंभेरीच्या किल्ल्यास वेढा घातला होता त्या वेळी मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव गोळी लागून ठार झाला. त्यामुळे भयंकर संतापून मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली की "सुरजमल जाटाचा शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती खणून यमुनेत टाकीन !"
 या प्रतिज्ञेचे वर्तमान ऐकून जाट घाबरून गेला. त्या वेळी वेढ्याच्या एका बाजूचे काम जयाप्पा शिंदे पाहात होते. त्यांच्याकडे रात्री गुप्तपणे जाऊन जाटाने त्यांच्या पायावर डोके ठेवले. 'शरण आलेल्याला मरण देऊ नये' हा धर्म आठवून जयाप्पांनी त्यास अभय दिले आणि वेढा ढिला केला. हे होळकरांना कळले तेव्हा शिंदे व होळकर या उभयतांत आधीच वैमनस्य होते ते विकोपाला गेले. शिंदे-होळकरांच्या या बिघाडामुळेच मराठे उत्तर हिंदुस्थानात अनेक वेळा अपयशी झाले आणि मराठी राष्ट्राची हानी झाली. जयाप्पा ज्या धर्माला जागले तो व्यक्तिधर्म होता, समाजधर्म नव्हता. मराठी राष्ट्राचा एक घटक या दृष्टीने ते स्वतःकडे पाहात नव्हते, तर महाराष्ट्रातला एक जयाप्पा नावाचा सरदार अशी त्यांची दृष्टी होती.
 आज शेकडो वर्षे आमच्या जीविताचे वळणच असे आहे; त्याची घडणच तशी झालेली आहे. आम्ही स्वकेंद्रित आहो. समाज हा आमच्या अवलोकनाचे केंद्र नाही. त्यामुळे समाज म्हणून जगण्याची विद्या आम्हांला हस्तगत करता येत