पान:माझे चिंतन.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी ३३ 

भयंकर जखमी होऊन शेवटी नेल्सन मृत्यू पावला. या घटनेचे वर्णन करून तिच्यावर भाष्य करताना नेल्सनचा चरित्रकार साऊदे याने म्हटले आहे, "थोर पुरुषाच्या मनाला हा मोह शेवटी वश करतोच; हे दौर्बल्य त्याच्या ठायी शेवटी दिसतेच."
 नेल्सनवर साउदेने ही जी टीका केली आहे ती अतिशय वरच्या मूल्यमापनातून केली आहे. आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या थोर पुरुषाच्या मनाचे हे फार सूक्ष्मपणे केलेले विश्लेषण आहे आणि त्यातून दिसून आलेले हे वैगुण्य आहे. आघाडीवर जाऊन निर्भयतेने प्राणत्याग करणे जेथे अवश्य असेल, त्यावरच सैन्याचे चैतन्य व अंतिम यश अवलंबून असेल, तेथे ते करणे अवश्यच आहे. तेथे माघार घ्यावी असे कोणीच म्हणणार नाही. पण काही प्रसंग असे येतात, की याच्या उलट धोरण ठेवणे विजयाच्या दृष्टीने अवश्य असते. पण कित्येक थोर पुरुषांच्या प्रकृतीला ते मानवत नाही; त्यांना यात कमीपणा वाटतो. पण राष्ट्रासाठी, अंतिम यशासाठी तो पत्करणे अवश्य असते. तेथे आत्मार्पण हे व्यक्तीच्या यशाला पोषक, पण राष्ट्राच्या हिताला मारक असते. तरीही जे थोर पुरुष हा विवेक न करता आत्मबलिदान करतात ते प्राणाचा त्याग करतात; पण स्वयशाचा, स्वकीर्तीचा करीत नाहीत. एरवी हे युक्तच आहे. पण त्या यशाचा त्याग करून राष्ट्राचे यश वाढविले पाहिजे अशी वेळ आली असतानाही तसे न करणे ही काहीशी मोहवशता आहे, ते दौर्बल्य आहे, असा साउदेचा अभिप्राय आहे. नेल्सन ती बिरुदे उतरण्यास तयार नव्हता, खाली केबिनमध्ये जाण्यास तयार नव्हता; कारण त्याला त्यात स्वतःच्या कीर्तीला कलंक लागेल ही भीती वाटत होती. पण या त्याच्या कृत्यामुळेच लढाई फसण्याचा संभव होता. मग त्यामुळे इंग्लिश राष्ट्राच्या कीर्तीला कलंक लागला असता. हा विवेक न सांभाळणे हीच मोहवशता असे साउदे म्हणतो.
 वैयक्तिक कीर्ती व राष्ट्राची कीर्ती यांत राष्ट्राच्या कीर्तीला वरचे स्थान देणे अवश्य होते असे त्याचे म्हणणे आहे. त्याच अर्थाने भाऊसाहेबांच्याविषयी मी लिहिले आहे. १६६५ साली जयसिंगापुढे शरणागती पतकरताना शिवछत्रपतींनी हा विवेक सांभाळला होता. वैयक्तिक मानापमानाच्या भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी त्या वेळी धारातीर्थी आत्मबलिदान केले असते, तर राजस्थानचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडून येऊन हिंदवी स्वराज्याची भाषाच संपली असती !