पान:माझे चिंतन.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३२ माझे चिंतन

पण राष्ट्रांचे मोठे सैन्य आणि मग राष्ट्राचे मोठे धन सुरक्षित राहून त्या पराभवाचा काळिमा धुऊन काढता आला असता. वैयक्तिक अपयश व राष्ट्राचे अपयश यांत भाऊसाहेबांनी पहिल्याची पर्वा न करता, दुसऱ्याची चिंता वाहणे अवश्य होते.
 पण आपल्याकडे शौर्यधैर्याच्या, वीरपरंपरेच्या, क्षात्रधर्माच्या कसोट्या अशा पाहात नाहीत. रजपूत लोक, रणातून परत फिरावयाचे नाही, अशा प्रतिज्ञेने निघत व धारातीर्थी देह ठेवीत. वैयक्तिक शौर्याची व त्यागाची ती परमसीमा होय हे खरे आहे; पण थोडा वैयक्तिक कमीपणा पतकरून, हे वैभव सोडून देऊन रजपूत वीरांनी त्या त्या वेळी माघार घेऊन, पुन्हा तयारी करून शिवछत्रपतींच्या प्रमाणे पुन्हा चढाई केली असती तर मुसलमानांचे आक्रमण कायमचे मोडून काढण्यात पुढे मराठ्यांना जे यश आले ते आधीच रजपुतांना आले असते; आणि राजस्थानची व मग अखिल भारताची राष्ट्रीय हानी टळली असती. वैयक्तिक क्षात्रधर्माच्या अतिरिक्त कल्पनेमुळे इतके रजपूत वीर रणात पडले, मारले गेले, की राजस्थान या राष्ट्राचा त्यामुळे कणाच मोडून गेला.

हा विवेक फार मोलाचा !

 भाऊसाहेब किंवा हे रजपूत वीर यांचे हे काहीसे मनोदौर्बल्य होय असे म्हटले तर वाचकांना ते अत्यंत विपरीत वाटेल. म्हणून इंग्रज या बाबतीत कसा विचार करतात ते सांगून पाहतो. पटले तर पटेलही. ट्राफल्गारच्या लढाईत नेल्सन हा इंग्लिशांचा अत्यंत मोठा सेनापती कामास आला. आरमारी लढाई चालू होती; नेल्सन हा अगदी वरच्या बाजूला डेकवर उभा राहून आज्ञा देत होता. त्याने त्यावेळी क्राऊन, इपॉलेट इत्यादी त्याच्या थोर सेनापतिपदाची सर्व बिरुदे अंगावर धारण केली होती. त्यामुळे तो सहज ओळखू येऊन फ्रेंच गोलंदाज नेल्सन त्याच्यावर गोळा टाकतील अशी भीती वाटून, त्याचे सरदार त्याला विनवू लागले, "महाराज, आपण एक तर ही बिरुदे उतरून ठेवा किंवा लढाई आम्ही सांभाळतो, तिच्यावर लक्ष ठेवून, आपण केबिनमध्ये बसून नुसत्या आज्ञा द्या." पण नेल्सनने यातले काहीच मान्य केले नाही. "ही बिरुदे मी भूषण म्हणून मिळविली आहेत आणि भूषण म्हणूनच मी ती छातीवर धारण करीन" असे त्याने उत्तर दिले. दुर्दैवाने त्याच्या अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली. फ्रेंचांनी त्या बिरुदांवरून त्याला ओळखून त्याच्यावर नेमका गोळा टाकला आणि त्यामुळे