पान:माझे चिंतन.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी ३१ 

आयसेनहोवर, नॉर्मा शेअरर, ग्रेटा गार्बो, पॉल मुनी यांसारखे एकही नाव जपानच्या इतिहासातून ऐकू येत नाही.
 उलट हिंदुस्थानच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासातच अशी कितीतरी नावे आढळतात. टिळक, सावरकर, महात्माजी, नेहरू, सुभाषचंद्र, जगदीशचंद्र, चंद्रशेखर रमण, सुब्बाराव, (अमेरिकेतील) शंकरराव गोखले, भाभा, राममोहन रॉय, विवेकानंद, रवींद्रनाथ, शरच्चंद्र, राधाकृष्णन्, उदयशंकर या व्यक्तींची कीर्ती जगात दुमदुमली आहे. यांच्या तोडीचा एकही पुरुष जपानमध्ये निर्माण झाला नाही. आपल्या भूमीचे हे वैभव स्पृहणीय आहे यात शंका नाही; पण असे असूनही गेल्या पन्नास वर्षात जपानने सामुदायिक जीवनात जे अलौकिक सामर्थ्य निर्माण केले आहे, त्याच्या शतांशानेही आपल्याला निर्माण करता आलेले नाही. या गोष्टीचा आपण अगदी जिवाला लावून घेऊन विचार केला पाहिजे.

अपयश : वैयक्तिक व राष्ट्रीय

 मला याची जी काही मीमांसा सांगावीशी वाटते, ती स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणे सांगतो. १७६१ साली पानपतची लढाई झाली. तीत दोन प्रहरपर्यंत विजयश्री मराठ्यांची होती. पुढे विश्वासराव पडले आणि सैन्य एकदम कच खाऊन सैरावैरा धावू लागले. अशा वेळी भाऊसाहेब वीराच्या आवेशाने एकदम सैन्यात घुसले व त्यांनी धारातीर्थी आत्मार्पण केले. हे दिव्य करताना त्यांच्या मनात असे आले, की आपण पुण्याहून एवढ्या प्रतिज्ञा करून आलो, आता हे अपयशी तोंड पुण्याला कसे दाखवावे ? या स्थितीत जगणे असह्य आहे असे म्हणून त्या वीर पुरुषाने मृत्यूला कवटाळले. वैयक्तिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांचे हे कृत्य भूषणावह असेच आहे. जो आत्मार्पणाला सिद्ध झाला, त्याच्यापुढे आपले मस्तक नम्र झालेच पाहिजे.
 पण ते तसे नम्र करून, सामाजिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांच्या या कृत्याचे मूल्यमापन करण्यास हरकत नाही. मराठी सत्तेच्या उत्कर्षाच्या दृष्टीने, हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने भाऊसाहेबांनी असे करावयास नको होते असे वाटते. त्या वेळी शांत मनाने रणातून माघार घेऊन, जितके सैन्य बचावणे शक्य होते तितके बचावून, अपयश पतकरून, पुण्याला अपयशी तोंड दाखविण्याची आपत्ती त्यांनी स्वीकारावयास हवी होती. त्यात वैयक्तिक मानहानी झाली असती हे खरे आहे;