पान:माझे चिंतन.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३० माझे चिंतन

मामेलुक निश्चित भारी आहे. शंभर फ्रेंच व शंभर मामेलुक असा सामना झाला तर बरोबरी होईल. आणि दहा हजार फ्रेंच व एक लक्ष मामेलुक अशी लढाई झाली, तर फ्रेंच मामेलूकांचा सपशेल पराभव करतील ! याचा अर्थ असा, की फ्रेंचांची संख्या वाढत जाते तसतसे त्यांचे बळ संख्येपेक्षा जास्त होत जाते आणि मामेलुकांची संख्या वाढू लागली की ते कमजोर होत जातात ! हे मानवी गणित आहे. जड वस्तूंच्या गणितापेक्षा ते फार निराळे आहे.
 आपण भारतीय हे मामेलुकांच्या गणितात बसतो; फ्रेंचांच्या नाही. वैयक्तिक हिशेब केला तर आपण खरोखरच जगात अद्वितीय ठरू; पण आपण संघ करू लागलो, चार माणसे एकत्र आली की आपले सामर्थ्य तितक्या पटीने न वाढता उलट कमी होते. असे का व्हावे याची मीमांसा करावयाची आहे. पण तसे करण्यापूर्वी आपण वैयक्तिक दृष्टीने खरोखरच कसे गुणसंपन्न आहो हे दिग्दर्शित करतो. म्हणजे याच गुणांची संघटना केली तर जगात आपण पराक्रमाच्या कोणत्या कोटी करू शकू याची कल्पना येईल.

त्यांचे सामुदायिक जीवनातील सामर्थ्य

 यासाठी जपानशी तुलना करणे उद्बोधक होईल. आपली अर्वाचीन काळातील सर्व प्रगती ब्रिटिश विद्येच्या प्रसारानंतरची म्हणजे शंभर-सव्वाशे वर्षातली आहे. अर्वाचीन जपानचा उत्कर्ष त्याच काळातला आहे. मेजी युगापासून जवळजवळ गेली पाऊणशे वर्षे जपान प्रगतीच्या मार्गाने अत्यंत वेगाने अंतर कापीत चालला आहे. समाजाची पुनर्घटना, औद्योगीकरण, राष्ट्रनिष्ठा, विज्ञान-अभ्यास, लष्करी सामर्थ्य या बाबतीत जगाला थक्क करून सोडील अशा गतीने जपान चालला आहे. पण असे असूनही जपानच्या या सर्व वैभवातील एक वैगुण्य जाणवल्याखेरीज राहात नाही. आम्ही भारतीय वैयक्तिक कर्तृत्व निर्माण करू शकतो, सामुदायिक जीवनाचा उत्कर्ष आम्हांस साधत नाही. जपान दुसऱ्या टोकाला आहे. सामुदायिक जीवनातील सामर्थ्याची त्याने अगदी तड गाठली आहे; पण वैयक्तिक वैभवात जपान फार खुजा आहे. गेल्या शंभर वर्षांत किंवा त्याच्या मागच्या काळातही जगाचे डोळे आपल्या गुणवैभवाने, व्यक्तित्वाने दिपवील असा एकही महापुरुष जपानमध्ये झाला नाही. अब्राहम लिंकन, रूझवेल्ट, लेनिन, एडिसन, मेरी क्युरी, डार्विन, पाव्हलॉव्ह, शॉ, इब्सेन, गॉर्कि, टॉलस्टाय, नेपोलियन, नेल्सन'