पान:माझे चिंतन.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी २९ 

एक विचार सारखा मनात येत असतो; तोच आज येथे विशद करून मांडावयाचा आहे. आमचे हे खेळाडू, वैयक्तिक रीतीने पाहिले तर जगातील कोणत्याही संघातल्या खेळाडूंच्या तोलाचे आहेत असे दिसते. मर्चंट, अमरसिंग, मनकड, हजारे हे तर इंग्लंड-ऑस्ट्रेलियांतील अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्याही तोडीचे आहेत; यांनी काही गुण त्यांनाही शिकवावे अशी यांची योग्यता आहे. हे आम्हीच म्हणतो असे नाही; इंग्लिश लोकांनीही याच सुरात त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. असे असल्यामुळे मनात एक कल्पना, एक आशा, एक स्वप्न नेहमी उभे राहते. हे एकेक खेळाडू जर असे भारी आहेत, तर असे अकरा खेळाडू एकत्र आणून त्यांचा संच केला, तर तो संच निश्चितच अजिंक्य होईल !

एक विचित्र हिशेब !

 तर्काने, गणिताच्या हिशेबाने हे बरोबर आहे. पण सत्यसृष्टी असल्या हिशोबाने चालत नाही. तिचे स्वतंत्र कायदे आहेत. ते कायदे प्रबल ठरतात आणि आमचे स्वप्न भंगून जाते ! ती आशा सफल होत नाही; ती कल्पना वाऱ्यावर विरून जाते. भारतीय जीवनातला हा सर्वांत मोठा दोष आहे. आमच्यात हत्तीचे बळ असलेले अनेक पुरुष सापडतात; पण असे अकरा पुरुष एकत्र झाल्यावर त्यांच्या संघात अकरा हत्तींपेक्षा जास्त बळ निर्माण व्हावे, तसे न होता ते कमी होते ! एकेकटे असताना शूर व समर्थ असणारे हे पुरुष एकत्र येताच त्यांचे सामर्थ्य वृद्धिंगत होण्याऐवजी कमी होते ! वैयक्तिक दृष्टीने आम्ही वाटेल तितके उंच- अगदी नक्षत्रापर्यंत जाऊ शकतो; पण समाज म्हणून, संघ म्हणून एकत्र येऊन त्यापेक्षाही उंच जावे हे आम्हांला जमत नाही. आम्ही खालीखालीच जातो. सांघिक, सामाजिक, सामुदायिक जीवनाची राजविद्या निराळीच आहे. ती आम्ही हस्तगत केलेली नाही.
 नेपोलियनने एकदा रणांगणातला एक हिशेब सांगितला होता. फ्रेंच सेना घेऊन तो इजिप्तमध्ये गेला होता. तेथील अरबांच्या एका जमातीचे नाव 'मामेलुक' असे होते. ते लोक अंगापिंडाने कणखर व शरीरांने धिप्पाड होते. फ्रेंच लोक त्या मानाने बारीक दिसत. तेव्हा या धिप्पाड लोकांशी लढताना फ्रेंचांचा धीर खचू नये, त्यांचा आत्मविश्वास ढळू नये म्हणून त्याने फ्रेंचांना मानवी गणिताचा हिशेब सांगितला. तो म्हणाला, एक फ्रेंच व एक मामेलुक यांचा सामना झाला तर