पान:माझे चिंतन.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे






भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी






जीवनाचे प्रतिबिंब
 क्रिकेटचा खेळ हे इंग्लिश राष्ट्राच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे असे म्हणतात. इंग्लिशांची जीवनाकडे पाहण्याची वृत्ती, त्यांची चिकाटी, शिस्त, धीमेपणा, दिलदारी या सर्व राष्ट्रीय गुणांचे आपणास त्यांच्या क्रिकेटच्या खेळात दर्शन घडते. वॉटर्लूची लढाई जिंकली तेव्हा इंग्रजांनी जे गुण प्रगट केले त्या सर्वाचा विकास ईटन व हॅरो या इंग्लंडमधील दोन शाळांच्या खेळाच्या मैदानांवर झाला होता असे नेहमीच सांगितले जाते. गेली पन्नास पाऊणशे वर्षे आपण भारतीयांनीही हा क्रिकेटचा खेळ उचलून आत्मसात केला आहे. त्यांत प्रावीण्यही संपादन केले आहे. आणि फार... फार निराळ्या अर्थाने तो खेळ आपल्याही राष्ट्रीय जीवनाचे प्रतिबिंब होऊन बसला आहे !
 फार निराळ्या अर्थाने म्हणजे कोणत्या ?

फार निराळा अर्थ

 या खेळात भारतीयांनी अगदी असामान्य प्रभुत्व संपादन केले आहे यात शंका नाही. रणजी, धुलीप ही नावे क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांत गाजली आहेत. रणजी हे तर त्या खेळाचे राजे, तो खेळ खेळणाऱ्यांचे परात्पर गुरु होऊन बसले आहेत. कॅ. नायडू, देवधर, जोशी, पै, विठ्ठल ही पूर्वीची आणि मर्चंट, मनकड, हजारे, अमरसिंग ही आताची नावेही या क्षेत्रात फार उंच जागी आरूढ होऊन बसली आहेत. इंग्लंडमध्येही त्यांना फार मान आहे. तेथील खेळाडूंच्या बरोबरीचा, क्वचित वरचाही मान त्यांना दिला जातो. हे सर्व पाहून