पान:माझे चिंतन.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २४ माझे चिंतन

आपण मतदान केले आहे, निवडणुका लढविल्या आहेत, लोकसभेत भाषणे केली आहेत इत्यादी आपल्या आचाराकडे बोट दाखवून आपली लोकशाहीवरील श्रद्धा ते क्षणार्धात सिद्ध करतील.

शिक्षणातील कर्मकांड :

 जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मनुष्याच्या या वृत्तीचा प्रत्यय आपणास येतो. सध्याच्या शिक्षणशास्त्राच्या व्यवहारात तर तिचा कळस झालेला दृष्टीस पडतो. अमुक एका पद्धतीनेच पाठ घेतला पाहिजे असा आग्रह या क्षेत्रात असतो. तो इतका की अर्थ न कळला तरी चालेल, विषय न समजला तरी चालेल, पण पद्धत अवलंबिली गेलीच पाहिजे अशी उत्तरे तज्ज्ञ म्हणविल्या जाणाऱ्या शिक्षकांनी दिलेली मी ऐकली आहेत. हा रानटीपणाचा कळस आहे, आणि या रानटीपणावर शिक्कामोर्तब झालेले आहे. पाठांची परीक्षा घेणारे जे परीक्षक त्यांना पाठाचा विषय येत नसला तरी चालते. कित्येक वेळा तो येत नसतो. संस्कृताचा गंधही नसणारा परीक्षक संस्कृतचा पाठ किंवा रसायनात मुळीच गती नसणारा मनुष्य रसायनाचा पाठ पाहून त्या शिक्षकाला पास-नापास करतो. आणि हे शास्त्राला, विद्यालयांना व विद्यापीठांनाही मंजूर आहे. याचा अर्थ असा की अध्यापन ही एक कसरत झाली आहे. ही कर्मकांडातील प्रक्रिया झाली आहे. अमुक कृती केली की अमुक फल मिळते, असे अंधपणे अदृष्टधर्मातल्याप्रमाणे येथे ठरविले जाते. तेथे कार्यकारण, अनुभव, प्रत्यक्ष मूल्यमापन यांचा संबंध राहिलेला नाही. काही हातवारे झाले की जादू होते. त्याप्रमाणे काही ठराविक चाकोरीतून शिक्षक वा विद्यार्थी यांची प्रश्नोत्तरे व तदनुषंगाने काही हातवारे झाले की अध्यापनाचे कार्य झाले अशी शिक्षकांची श्रद्धा आहे आणि या शिक्षणामुळे मुलांच्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा, चारित्र्याचा विकास कितपत झाला याचे मापन पुढे कोणीच करीत नसल्यामुळे कर्मकांडाचे फल स्वर्गात किंवा नरकात किती मिळते हे जसे अज्ञात आहे तसे या पद्धतीचे झाले आहे. निश्चित ज्ञान, जिज्ञासा, चारित्र्य, कर्तृत्व हा जो आत्मा तो बुद्धिपुरस्सर दुर्लक्षिला जावा ही नरोटीच्या उपासनेची अगदी परमसीमा होय.
 मावळातील खेड्यात गणेशचतुर्थीच्या दिवशी शेतकरी शेतात जाऊन पिकाच्या मध्यभागी झाडाची एक लहानशी फांदी पुरून ठेवतो. ही चाल आज अनेक वर्षे रूढ आहे. तसे करण्याचे कारण तेथे कोणालाच माहीत नाही. एका जुन्या पुस्तकात