पान:माझे चिंतन.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नरोटीची उपासना २३ 

अशी सोव्हियेट धुरीणांची अचल श्रद्धा आहे. मार्क्सवादाचा सांगाडा, त्याचे जडस्वरूप याला ते बिलगून बसले आहेत. आज त्यांनी जाणूनबुजूनच हे चालविले आहे. कालांतराने लोकांच्या ते अंगवळणी पडेल, आणि खरा मार्क्सधर्म तो हाच असे त्यांना वाटू लागेल. गादीवर निजावयाचे व थोडे गवत गादीखाली ठेवायचे, ताटात जेवावयाचे पण एक पान त्याच्याखाली ठेवायचे, एवढे केले की राणाजींच्या मृत्युसमयी केलेल्या प्रतिज्ञांचे पालन केल्याचे पुण्य मिळते ही जशी रजपूत राजांची श्रद्धा होती त्याप्रमाणे शासनयंत्र पूर्ण जोरात चालवावयाचे पण त्याच्याखाली एखादा कामगार उभा करावयाचा म्हणजे शासनसंस्थेचा नाश केल्याचे पुण्य मिळते, अशी कार्ल मार्क्सच्या अनुयायांची दृढ, अढळ श्रद्धा आहे.
 जिवंत तत्त्वाला जडरूप देऊन त्याचीच उपासना करीत बसावयाचे, आणि अशा रीतीने त्याचा मूलहेतू विफल करून टाकावयाचा या मानवाच्या वृत्तीमुळेच जगात आजपर्यंत अनेक थोर महात्मे जगदुद्वाराच्या प्रयत्नात खर्ची पडूनही जग आहे तेथेच आहे. बुद्धाची अहिंसा, जीजसची दया, महात्माजींचे सत्य या प्रत्येकाची मानवाने अशी दशा करून टाकली आहे. आज जेथे मार्क्सवाद नाही तेथे लोकशाहीची उपासना चालू आहे. पण तेथेही पद्धत हीच आहे; बाह्यरूपाविषयी माणसे पराकाष्ठेची दक्षता दाखवितात. अंतरात्म्याची त्यांना काळजी नसते. इतकेच नव्हे तर त्यांना त्याची दखलही नसते. जड सांगाडा म्हणजेच लोकशाही अशी त्यांची श्रद्धा असते. निवडणुका, मतदान, लोकसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पॉइंट ऑफ ऑर्डर, कोरम, सभासदांचे हक्क, मतमोजणी, यांविषयी लोक जसे दक्ष असतात तसे सर्व राष्ट्राची जबाबदारी प्रत्येकाने घेणे, समाजहितासाठी अंग झिजविणे, आपणच केलेल्या कायद्याचे पालन करणे, सार्वजनिक कारभार निर्मळ राखणे, बुद्धिवादाची जोपासना करणे, प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करणे इत्यादींविषयी मुळीच नसतात. लोकशाहीच्या धर्माच्या उपासनेत याचा अंतर्भाव होतो हे त्यांना पटतच नसते. म्युनिसिपालिटीच्या खताच्या गाड्या आपल्या शेतात नेणे, जकात न देता गावात माल आणणे, प्राप्तीवरील कर चुकविणे, आपल्या घराच्या सोयीनी रस्ते करणे, पब्लिक सर्व्हिस कमिशनचे आदेश धुडकावून आपल्याच पित्त्यांची वर्णी लावणे, जातीयवादाला चिथावून निवडणुका लढविणे हे आचार करणाऱ्यांना 'तुम्ही लोकशाहीशी द्रोह करीत आहा' असे जर कोणी म्हटले तर ते मिर्झा राजे जयसिंग यांच्याप्रमाणेच चकित होतील.