पान:माझे चिंतन.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नरोटीची उपासना २५ 

त्याचे कारण पुढीलप्रमाणे दिलेले आहे. या महिन्यापासून पाऊस कमी होतो. शेतजमीन थोडी उघडी पडते व मग तेथे उंदीर फिरू लागतात आणि पिकांची खराबी करतात. शेतात या वेळी पुरुषभर उंच असे डांभे पुरून ठेवले की त्यावर कावळे येऊन बसतात व ते उंदरांना मारतात. त्या भयाने मग उंदीर येईनासे होऊन पिकांची खराबी होत नाही. पण शेतकऱ्यांना यातले काहीच माहीत नाही. ते हा एक धार्मिक विधी म्हणून करतात. त्याचे फल सर्व धार्मिक विधीप्रमाणे अदृष्टच आहे. त्यामुळे म्हणजे फलाचे मूल्यमापन नसल्यामुळे, हेतू व कृती यांचा प्रत्यक्ष संबंध अज्ञात राहिल्याकारणाने शेतकरी दहापंधरा डांभे न पुरता एकच पुरतात व तोही साधारण हातभर उंचीचा ! तो पिकाच्या खाली झाकून जात असल्यामुळे त्याचा काहीच उपयोग नसतो. पण धार्मिक विधीच्या प्रत्यक्ष उपयोगाची चिकित्सा करावयाची नसते. यांत्रिक कसरत झाली की आपले काम संपले, पुढे सर्व दैवाधीन आहे अशीच भावना असते.
 आपले वनमहोत्सव, आपल्या 'अधिक धान्य पिकवा' यांसारख्या मोहिमा, आपला ग्रामोद्धार, आपल्या विकास योजना, या सर्वांना कालांतराने हे धर्मविधीचे रूप प्रात होणार आहे अशी मला भीती वाटते. अन्नधान्याच्या मोहिमा का फसल्या त्याची चिकित्सा करताना अनेक तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, नेमलेल्या अधिकाऱ्यांनी जड यंत्राप्रमाणे हुकमाची तालीम करण्यापलीकडे काहीच केले नाही. विहिरी खणा म्हटले तेव्हा त्यांनी विहिरी खणल्या. गावात जुन्या विहिरी किती आहेत, डागडुजीने दुरुस्त किती होऊ शकतील, त्यांचे पाणी किती पुरेल याचा विचारही त्यांनी केला नाही. विहीर खणणे हा त्यांच्या मते अदृष्टफल देणारा धार्मिक विधी होता. तो त्यांनी केला. खते वाटणे, शेतकऱ्यांना बियाणाचा पुरवठा करणे, तगाई देणे या सर्वांचा कारभार असाच चालू आहे. कहींनी तर पुण्यामुंबईच्या हपिसांत बसून, इतकी खते दिली आहेत, इतके बी दिले आहे, तेव्हा इतके पीक येणारच असा हिशेब करून वर्षअखेर तसा अहवालही लिहून टाकला. काही अभ्यासकांनी अशी तक्रार केली आहे की हिंदुस्थान सरकारकडे येणारे पुष्कळ आकडे असे असतात. वनमहोत्सवातही असे अनेक प्रकार घड़ल्याचे ऐकू येते. झाडे लावा असा हुकूम येताच झाडे लावली गेली. त्यांची निगा, त्यांचे खतपाणी, त्यांची उपयुक्तता, त्यांतील तारतम्य याचा विचार बऱ्याच ठिकाणी झाला नाही. म्हणजे हा धर्मविधी झाला. हे कर्मकांड झाले.