पान:माझे चिंतन.pdf/३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २२ माझे चिंतन

काळच्या शाक्तपंथीयांप्रमाणे आश्रय करतात. गेल्या पंचवीस वर्षांत फ्रान्स, जर्मनी, इटली, झेकोस्लोव्हाकिया, पोलंड या देशांत दुही माजविणे, फूट पाडणे, अत्याचार करणे, दंगल माजविणे हा उद्योग त्यांनी चालविला आहे. यामुळे त्या त्या देशाची कसलीही प्रगती न होता ते देश दुबळे होऊन बसले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. या अत्याचारांनी आपण मार्क्सचेच प्रतिपालन करीत आहो, अशी मार्क्सवाद्यांची श्रद्धा आहे.
 धर्म ही अफू आहे, असे कार्ल मार्क्सने सांगून टाकले होते. परलोक, पुनर्जन्म, स्वर्ग या कल्पनांच्या नादी लोकांना लावून त्यांच्यावर होणाऱ्या जुलमाचा त्यांना विसर पाडणे, प्रतिकाराची त्यांची बुद्धी बधिर करूर टाकणे ही कामे धर्माने केल्यामुळे त्याने तसे उद्गार काढले होते. काल्पनिक सुखाच्या विलोभनाने लोकांची मने बेहोष करून टाकून त्यांना वस्तुस्थितीचा विसर पाडणे हे पातक आहे, असा मार्क्सच्या विधानाचा आशय आहे. तो आशय सोव्हियेट नेते विसरले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी मार्क्सधर्मालाच अफूचे स्वरूप दिले आहे. स्टॅलिनचे ते परमेश्वराप्रमाणे गुणगान करतात. तो पृथ्वीवरच स्वर्ग आणून देणार आहे, कामगारांचे नंदनवन निर्माण करणार आहे, अशी आश्वासने देतात. काही वर्षांनी रशियात विपुल, अतिविपुल समृद्धी निर्माण होणार आहे, प्रत्येकाला त्याच्या सगळ्या गरजा पुरविता येतील इतके धन आम्ही लवकरच देऊ, अशी अभिवचने देतात. या कल्पनासृष्टीत रशियन कामगार गुंग आहेत. या सध्याच्या जगात सारखे विषप्रयोग व अन्यायी खटले चालू आहेत. कोटी दीड कोटी कामगारांना मजूरवाड्यात, सैबेरियात गुलामापेक्षाही हीन जिणे जगावे लागत आहे. या घोर परिस्थितीचा त्यांना विसर पडावा यासाठीच ही योजना आहे.
 शासनसंस्थेचा विलय, कामगारांचे नेतृत्व, जगातील कामगारांची संघटना, स्त्रीचे दास्यविमोचन, व्यक्तीचे आर्थिक स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीयता या प्रत्येक तत्त्वाच्या बाबतीत सोव्हियेट रशियाने नरोटीची उपासना चालविली आहे. त्यातील श्रीफल नष्ट झाले आहे. त्यानेच ते नष्ट केले आहे. आणि मुसलमानांच्या राज्यविस्तारासाठी, हिंदुराज्यांच्या विनाशासाठी तनमनधन अर्पण केले तरी तो हिंदुधर्माशी द्रोह होत नाही, ही ज्याप्रमाणे येथील समाजधुरीणांची श्रद्धा होती त्याचप्रमाणे मानवाचे व्यक्तित्व, त्याचे सुख, त्याची उन्नती, त्याचे सर्व क्षेत्रांतील स्वातंत्र्य यांना पदोपदी हरताळ फासूनही आपण मार्क्सधर्माशी द्रोह करीत नाही,